Join us  

बिश्नोईनं दिला तिसरा पर्याय; टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा मारा होणार दमदार

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडनेही बिश्नोईचा सामना करणे आव्हानात्मक असल्याचे मान्य केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 5:34 AM

Open in App

बंगळुरू : आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात रवी बिश्नोईची निवड झाली. तेव्हाच भारतीय निवडकर्ते पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० च्यादृष्टीने दीर्घकाळ योजनेनुसार बिश्नोईचा विचार करत असल्याचे स्पष्ट झाले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावत बिश्नोईने आपल्यावरील विश्वास सार्थही ठरवला. 

अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे टी-२० मध्ये यापुढे चहलच्या आधी बिश्नोईचा विचार होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. चहलने यंदा ९ टी-२० सामन्यांत ९ बळी घेतले आहेत, तर बिश्नोईने ११ सामन्यांतून १८ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत बिश्नोईने ९ बळी घेत मालिकावीर पुरस्कार पटकावला. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडनेही बिश्नोईचा सामना करणे आव्हानात्मक असल्याचे मान्य केले होते. तो म्हणाला की, ‘भारताच्या फिरकीपटूंनी मालिकेत चांगली कामगिरी केली. विशेष करून बिश्नोईने शानदार गोलंदाजी केली. त्याचा सामना करणे सोपे नव्हते.’ त्याचप्रमाणे श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनने म्हटले की, ‘बिश्नोई इतर लेगस्पिनर्सच्या तुलनेत विशेष ठरतो. तो वेगाने चेंडू टाकतो. फिरकीस पोषक खेळपट्टीवर त्याचा सामना करणे अत्यंत आव्हानात्मक ठरेल.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ