अहमदाबाद : मागच्या लढतीतील ढिसाळ गोलंदाजी विसरून राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे अवघड आव्हान राहील. दुसरीकडे लखनौला एलिमिनेट केल्यामुळे आरसीबीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७.३० पासून हा सामना खेळला जाईल.
भाग्याची साथ लाभताच नाट्यमयरित्या प्ले ऑफ गाठल्यानंतर आरसीबीने काल लखनौला १४ धावांनी धूळ चारली. मागच्या १४ वर्षांपासून जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या आरसीबीकडून मोठ्या अपेक्षा असून खेळाडूदेखील अपेक्षापूर्तीसाठी उत्सुक आहेत. रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेल्या रजत पाटीदारने एक शतकी खेळी करीत संघाचे आणि स्वत:चेही भाग्य बदलले. कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस हे मोठ्या सामन्यातील खेळाडू आहेत. लखनौविरुद्धचे अपयश पुसून काढण्याची संधी दोघांकडे असेल. ‘फिनिशर’च्या भूमिकेत असलेला दिनेश कार्तिक राजस्थानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याच्या तयारीत आहे. आरसीबीचा विजयी संघ बदलण्याची शक्यता कमीच आहे.
वानिंदु हसरंगा साहसी मारा करतो तर अखेरच्या टप्प्यात हर्षल पटेल बळी घेण्यात तरबेज मानला जातो. मोहम्मद सिराजनेदेखील चांगली कामगिरी केली असून डेथ ओव्हरमध्ये जोश हेजलवूडने स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला. त्याचे यॉर्कर खेळणे प्रतिस्पर्धी फलंदाजांना कठीण झाले आहे.
जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांना धावा काढण्यापासून रोखण्याचे आव्हान या सर्व गोलंदाजांपुढे असेल. या दोघांनी गुजरातविरुद्ध धावा केल्या, पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. सॅमसनने चांगली सुरुवात केली, मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला होता. रॉयल्सच्या गोलंदाजांनादेखील अपयश विसरून नव्या जोमाने कामगिरी करावी लागणार आहे. रविचंद्रन अश्विन हा गुजरातविरुद्ध अपयशी ठरला. वेगवान प्रसिद्ध कृष्णा याला अखेरच्या षटकात डेव्हिड मिलरपुढे फूललेंग्थ चेंडू टाकण्याची घोडचूक भोवली. कृष्णाची धुलाई होत असताना अनुभवी ट्रेंट बोल्ट याला अखेरच्या षटकासाठी सॅमसनने का राखून ठेवले नाही, हा प्रश्न अनेकांना पडला होता.
अखेरचे षटक टाकण्याची भीती वाटत नाही
‘अखेरचे षटक टाकण्याची आणि दडपणावर मात करण्याची आता सवय झाली आहे.चांगली कामगिरी होईल की नाही याची चिंता नसते. अनेक सामन्यात पराभव पचवावा लागतो, हे चालणारच. आव्हान पेलण्यास मात्र घाबरत नाही. काल स्टोयनिसपुढे थोडा नर्व्हस होतो, पण स्वत:वर विश्वास राखूनच मारा केला.’ - हर्षल पटेल
‘ एक दिवसानंतर पुन्हा खेळायचेय, ही चांगली गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये पुन्हा खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत. स्वत:च्या कामगिरीवर मी आणि माझे सहकारी समाधानी आणि रोमांचित आहेत.’ - विराट कोहली
एकूण राजस्थान आरसीबी
लढती विजयी विजयी
२४ ११ १३
५ लढती ०१ ०४
२०२२ ०१ ०१
अहमदाबाद ०० ०१
Web Title: Bitter challenge for Royals, second qualifier today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.