वेलिंग्टन : आगामी भारताविरुद्धचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे न्यूझीलंडचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज बी. जे. वॉटलिंग याने जाहीर केले. १८ जूनपासून साऊदम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी अंतिम सामना रंगणार आहे. मात्र, त्याआधी यजमान इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.न्यूझीलंड क्रिकेटच्या वतीने पुढील सत्रासाठी आपल्या २० करारबद्ध खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच वॉटलिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या यादीमध्ये त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमी होती, अशीही चर्चा आहे. ३५ वर्षीय वॉटलिंगने गेल्या काही कसोटी सामन्यांत न्यूझीलंडसाठी चमकदार कामगिरी केली होती. २००९ साली सलामीवीर आणि पर्यायी यष्टिरक्षक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतर २०१३ साली ब्रेंडन मॅक्क्युलमने यष्टिरक्षण करणे सोडले आणि वॉटलिंगकडे ही जबाबदारी आली. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम रचले.वॉटलिंगने न्यूझीलंड क्रिकेटच्या (एनझेडसी) पत्रकाद्वारे म्हटले की, ‘ही योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेट हे खरे सर्वोच्च शिखर आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसह कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक क्षणाचा पूर्ण आनंद घेतला. पाच दिवस मैदानावर घाम गाळल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांसोबत वेळ घालवण्याच्या क्षणांची मला खूप आठवण येत राहील.’ वॉटलिंगने आतापर्यंत ७३ कसोटी सामन्यांत ३८.११ च्या सरासरीने ३,७७३ धावा केल्या असून यात ८ शतके व १९ अर्धशतके आहेत.
सर्वोत्तम यष्टिरक्षकवॉटलिंगने ६५ कसोटी सामन्यांत यष्टिरक्षण करताना ३,३८१ धावा केल्या. किवी यष्टिरक्षकाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. वॉटलिंगने यष्टिरक्षणात २५७ बळी घेतले असून तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा किवी यष्टिरक्षक आहे.