Rivaba Jadeja Angry: भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकला. उर्वरीत तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून जड्डूला संघात स्थान मिळाले आहे. पण, त्याच्या फिटनेसवर त्याचे पुनरागमन अवलंबून आहे. जडेजा त्याच्या घरातील कौंटुबिक कलहामुळे चर्चेत आहे. त्याचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांनी जड्डूसह त्याची पत्नी आमदार रिवाबा जडेजावर गंभीर आरोप केले. पण, रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्व आरोप फेटाळले होते.
अलीकडेच एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जड्डूच्या वडिलांनी सांगितले होते की, रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिबावा जडेजा यांच्याशी माझे काहीच नाते नाही, हे सत्य आज मी तुम्हाला सांगत आहे. आम्ही त्यांना फोन करत नाही आणि ते आम्हाला फोन करत नाही. जडेजाच्या लग्नाच्या दोन-तीन महिन्यानंतर हा वाद सुरू झाला. सध्याच्या घडीला मी रवींद्रच्या घरात नाही, तर जामनगर येथे राहतो. त्याची पत्नी रिबावाने त्याच्यावर कोणती जादू केली आहे हे माहित नाही. पण, माझ्या मुलासाठी माझे काळीज तुटते. त्याने लग्नच केले नसते तर बरे झाले असते असे मला वाटते. त्याला मी क्रिकेटपटूच बनवले नसते तर बरे झाले असते. किमान असा दिवस पाहायला मिळाला नसता. रिवाबाला केवळ पैसा हवा आहे.
आमदार रिवाबा भडकलीरिवाबा जडेजा ही भाजपाच्या तिकिटावर विधानसभेला निवडून आली. ती जामनगर उत्तर येथून आमदार बनली. सासऱ्यांनी केलेल्या आरोपांबद्दल रिवाबाला विचारले असता ती संतापली. आमदार रिवाबाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा तिथे एका पत्रकाराने रिवाबाला अनिरूद्धसिंह जडेजा यांनी केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न केला. यावर रिवाबा म्हणाली की, आम्ही इथे का आलो आहे? या प्रकरणी तुम्हाला काही बोलायचे असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा. इथे चांगल्या कामात याचे उत्तर हवे असेल तर माझ्याशी संपर्क साधा. रिवाबाच्या या संतप्त प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, ६ डिसेंबर १९८८ मध्ये रवींद्र जडेजाचा जन्म गुजरातच्या जामनगर येथील नवागाम गड सिटी येथील गुजराती राजपूत कुटुंबात झाला. रवींद्रने भारतीय सैन्यात जावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. २०१६ मध्ये रवींद्र आणि रिवाबा यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे.