नवी दिल्ली - भारतात अनेक क्रिकेटपटू असे आहेत, जे राजकारणी बनले आहेत. तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून लोकप्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये दोन आक्रमक आणि विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. दरम्यान, एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दोन वेगवेगळ्या राजकीय असलेले हे क्रिकेटपटू आज आमने-सामने आले. हे क्रिकेटपटू म्हणजे भाजपा खासदार गौतम गंभीर आणि आपचे खासदार हरभजन सिंग यांची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनीही फोटो शेअर केले आहेत.
गमतीची बाब म्हणजे गौतम गंभीरने हरजभजन सिंगसोबत फोटो शेअर करताना त्याखाली एक गमतीदार कॅप्शन लिहिली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं लिहिलं की, AAPसे तो पुरानी पुरानी दोस्ती है और रहेगी.
गौतम गंभीर भाजपाकडून लोकसभेवर निवडून आला आहे. तर हरभजन सिंग याला आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर पाठवलं आहे. दरम्यान, गौतम गंभीर दिल्लीतीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षावर आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने टीका करत असतो.
मात्र याचा परिणाम हरभजन सिंग आणि गौतम गंभीर यांच्यातील मैत्रीवर झालेला नाही. त्यामुळेच त्याने फोटो शेअर करताना गमतीदार कॅप्शन दिली आहे. हरभजन सिंगनेही हा फोटो रिट्विट केला आहे. तसेच त्यात त्याने लिहिले की, लिजेंड गौतम गंभीर तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं.
हल्लीच आटोपलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाचं मेंटॉरपद भूषवलं होतं. लखनौच्या संघानं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं, होतं. पहिल्याच हंगामात लखनौची कामगिरी लक्षणीय ठरली आहे.