भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यानं कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली. एवढंच नव्हे तर तृतीय पंथीयांनाही लॉकडाऊनच्या काळात त्यानं रेशन पुरवले. आता गंभीरनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि त्याच्या पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी 'जन रसोई' सुरू केली आहे.
गुरुवारी त्यानं गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे उद्घाटन केले. त्यानंतर अशोक नगर येथे दुसरी कँटिन सुरू केली जाणार असल्याचे, त्याच्या कार्यालयातून सांगण्यात आले. ''कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते,''असे गंभीर म्हणाला.
त्यामुळे पूर्व दिल्लीतील दहा विधानसभा मतदारसंघात जन रसोई कँटिन सुरू करण्याचा विचार गंभीर करत आहे. ''देशातील सर्वात मोठं होलसेल गार्मेंट मार्केट गांधी नगरमध्ये आहे आणि तेथे जन रसोई कँटिन उघडण्यात आली आहे. येथे १ रुपयांत जेवण दिले जाणार आहे,''असे गंभीरच्या कार्यालयानं सांगितलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कँटिनची क्षमता १०० माणसांची आहे, परंतु कोरोना नियमांमुळे एका वेळी ५० लोकांनाच येथे येता येणार आहे. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी असा आहार असणार आहे.
गौतम गंभीर स्वतःच्या खिशातून आणि गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा खर्च उचलणार आहे. त्यासाठी तो सरकारची मदत घेणार नाही.