भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर नेहमी समाजकार्यासाठी पुढे असतो. कोरोना व्हायरसच्या संकटात गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून आर्थिक मदत केली, शिवाय त्यानं दिल्ली सरकारला एक कोटींची आणि PPE किट्सची मदतही केली. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटपटूनं लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचं वाटपही केलं. शिवाय त्याच्या फाऊंडेशननं दिल्लीतील किन्नरांनाही मदत केली. समाजकार्यात नेहमी सक्रिय असलेल्या गंभीरनं आता Sex Workers च्या मुलींच्या स्वप्नांना 'पंख' देण्याचे संकल्प केला आहे.
पूर्व दिल्लीतील खासदार गंभीरने शुक्रवारी एक महत्त्वाची घोषणा केली. दिल्लीतील GB रोड येथील Sex Workers च्या मुलींना गंभीर मदत करणार आहे. 'पंख' असे या संकल्पनेचं नाव आहे. या योजनेतून sex workers च्या २५ लहान मुलींची जबाबदारी घेतली जाणार आहे. गंभीरने सांगितले की,"समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि या मुलींना ती संधी मिळावी याची काळजी मी घेणार आहे. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता यावी, यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहोत. त्यांच्या राहण्याची, शिक्षणाची आणि आरोग्याची आम्ही जबाबदारी घेणार आहोत."
आतापर्यंत दहा मुलींची निवड केली गेली आहे आणि त्या वेगवेगळ्या सरकारी शाळांत शिकत आहेत, असेही गंभीरने सांगितले. "त्यांच्या शाळेची फी, गणवेश, खाणं, वैद्यकीय खर्च आदी सर्व खर्च आम्ही उचलणार आहोत," असेही त्याने सांगितले. २५ मुलींना मदत करण्याचं लक्ष्य ठेवले आहे. गंभीरने यावेळी इतरांनाही पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. याआधी गंभीरने शहीद जवानांच्या २०० मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.