भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला वगळले आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा वेग धरला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य संपल्यात जमा असल्याची चर्चा तेव्हापासून सुरू होती. त्यात बीसीसीआयनं त्याला वगळल्यानं यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचा, तर्क लावला जात आहे. पण, आता धोनीला करार न देण्यामागे राजकीय कारण असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीमुळे धोनीचा बीसीसीआय करारातून पत्ता कट केल्याचा दावा केला जात आहे.
Big Breaking : बीसीसीआयनं वार्षिक करारातून महेंद्रसिंग धोनीचं नाव वगळलं
खरंच, धोनी पर्वाचा अंत? जाणून घ्या बीसीसीआयनं करारातून वगळण्याचा नक्की काय अर्थ
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं पंधरा दिवस भारतीय सैनिकांसोबत देशसेवाही केली होती. त्यानंतर सर्वांना धोनीच्या पुनरागमनाची उत्सुकता होती. पण, गुरुवारी बीसीसीआयनं गुगली टाकून ही उत्सुकता संपवून टाकली. क्रिकेटनंतर धोनी राजकारणात सक्रिय होईल, असाही अंदाज बांधला जात होता. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वी धोनीची भेटही घेतली होती. त्यामुळे धोनी भाजपाचा झेंडा हाती घेईल असे वाटले होते आणि तशा बातम्याही आल्या होत्या. पण, तसे काहीच झाले नाही.
त्यामुळेच धोनीला बीसीसीआयने सेंट्रल करारातून वगळल्याचा दावा काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक गौरव पांधी यानं केला आहे. झारखंड निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची सत्ता गेली. झारखंड मुक्ती मोर्चा ( 30), काँग्रेस ( 16), राष्ट्रीय जनता दल ( 1) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( 1) यांच्या आघाडीनं 48 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. भाजपाला 79 पैकी 25 जागाच जिंकता आल्या.
त्याचा राग भाजपानं धोनीवर काढल्याचा दावा पांधी यांनी केला आहे. ते म्हणाले, ''धोनीनं झारखंड निवडणुकीत भाजपात प्रवेश करावा आणि निवडणुक लढावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. पण, धोनीनं त्यास नकार देत क्रिकेट खेळण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर त्याला प्रचारासाठी विचारण्यात आले आणि तेव्हाही त्यानं नकारच दिला. त्याचा परिणाम म्हणून बीसीसीआयनं त्याला सेंट्रल करारातूनच वगळले?'' विशेष म्हणजे अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत.