मुंबई : ‘हवेत फटके मारणे काही गुन्हा नाही. युवांना आपला नैसर्गिक खेळ दाखविण्याची सूट मिळायला हवी,’ असे स्पष्ट मत भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केले. रोहित म्हणाला,‘मोठे फटके खेळणे वाईट नाही. ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही उंचावरुन फटके मारत होतो आणि आम्हाला नेट््समधून बाहेर करण्यात येत होते. कारण शेवटी निकाल महत्त्वाचा असतो. जर एखादा खेळाडू हवेत फटके खेळूनही अनुकूल निकाल देत असेल, तर त्यात वाईट नाही. युवांना असे फटके खेळणे आवडते. फलंदाजी करताना प्रत्येक खेळाडू लक्ष वेधण्यास इच्छुक असतो, पण त्याने आपला नैसर्गिक खेळ दाखवावा.’
रोहित म्हणाला, ‘वारंवार चुका न होण्यावर लक्ष द्यायला हवे. पुढच्या लढतीत कसे खेळायचे याचा प्रत्येक खेळाडूने विचार करायला हवा. आक्रमक फटके खेळणे काही अपराध नाही. जर एखाद्या खेळाडूला आपल्या कौशल्याबाबत आत्मविश्वास असेल तर त्याला मी प्रोत्साहन देईन. युवांना नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे.’