पणजी : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडचा ५ गड्यांनी पराभव केला.याबरोबरच भारताने अंध क्रिकेट टी-२० तिरंगी मालिकेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार अजय रेड्डी. त्याने ३ षटकांत ४ बळी घेतले. तोच सामनावीर ठरला. आता बुधवारी (दि.१०) भारताची लढत श्रीलंकेविरुद्ध होईल. ही स्पर्धा क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया तसेच समर्थनम यांनी आयोजित केली आहे. गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात उष्ण आणि दमट हवामान असलेल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार एड हॉस्सेल याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार अजय रेड्डीने पहिल्याच षटकामध्ये इंग्लंडचे २ फलंदाज बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा संघ पुन्हा सावरू शकला नाही आणि २० षटकांमध्ये ८ फलंदाज गमावून त्यांनी १३१ धावा केल्या. पिट ब्लूईट्ट याने सर्वाधिक ५४ धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सावधपणे सुरुवात केली. फक्त ४५ धावांमध्ये २ फलंदाज गमावल्यानंतर सुनील रमेशने २९ चेंडूंमध्ये केलेल्या नाबाद ५२ धावांमुळे भारताने इंग्लंडवर सहज विजय नोंदवला. अजय रेड्डीने ३ षटकांमध्ये १२ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. या विजयानंतर आता भारतीय अंध क्रिकेट संघाची गुणसंख्या ९ झाली आहे. तर इंग्लंडला अजूनही आपले गुणांचे खाते उघडता आलेले नाही. संक्षिप्त धावफलक : इंग्लंड २० षटकांत ८ बाद १३१. फलंदाजी-पिट ब्लूईट्ट ५२, गोलंदाजी- अजय रेड्डी ४/१२. पराभूत वि. भारत १६.३ षटकांत ५ बाद १३३. फलंदाजी- सुनील नाबाद ५२. गोलंदाजी- जस्टीन २/२८. सामनावीर-अजय रेड्डी.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अंध तिरंगी क्रिकेट मालिका : भारताची इंग्लंडवर मात
अंध तिरंगी क्रिकेट मालिका : भारताची इंग्लंडवर मात
भारताने अंध क्रिकेट टी-२० तिरंगी मालिकेत विजयी घोडदौड कायम राखली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 7:43 PM
ठळक मुद्देभारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार अजय रेड्डी. त्याने ३ षटकांत ४ बळी घेतले. तोच सामनावीर ठरला.