- रोहित नाईक
मुंबई : आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेटविश्वात एकहाती वर्चस्व राखलेल्या भारतीय पुरुष संघाकडून प्रेरणा घेत आता महिला अंध क्रिकेटपटूही पुढे आल्या आहेत. लवकरच अंध क्रिकेटविश्वात महिलांचे सामने रंगणार असून, पुढील महिन्यात मुंबईत अंध महिला क्रिकेटपटूंची राज्यस्तरीय स्पर्धा रंगणार असल्याची माहिती क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड आॅफ महाराष्ट्रचे सचिव रमाकांत साटम यांनी ‘लोकमत’ला दिली.
‘क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इन इंडिया’च्या (कॅबी)वतीने मुंबईत सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका द्विपक्षीय टी२० मालिकेदरम्यान साटम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. या वेळी त्यांनी माहिती दिली की, ‘पुरुष अंध क्रिकेटपटूंच्या कामगिरीने प्रेरणा घेत काही महिन्यांपूर्वी इच्छुक अंध महिलांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही त्या खेळाडूंना त्यांच्या विभाग प्रमुखांशी संपर्क करून दिला आणि त्यांनी खेळण्यास सुरुवात केली. ही संख्या बघता बघता वाढत गेली आणि राज्यभरातून महिला खेळाडू पुढे आल्या. फेब्रुवारी २०१८ मध्ये आम्ही महिलांची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा खेळविली. यानंतर कानपूर व पश्चिम बंगालमध्येही अंध महिला स्पर्धांचे आयोजन झाले, पण सुरुवात महाराष्ट्रातून झाल्याचा अभिमान आहे. लवकरच अंध महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
निवडक खेळाडूंची सराव शिबिरात निवड
२२ व २३ नोव्हेंबरला मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे रंगणाऱ्या अंध महिला राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई आणि कोकण अशा सहा विभागीय संघांचा समावेश असून यामध्ये सुमारे शंभर खेळाडूंचा सहभाग असेल. या स्पर्धेतून निवडक खेळाडूंची सराव शिबिरासाठी निवड होईल आणि त्यातून महाराष्ट्र संघ जाहीर होईल, अशी माहिती साटम यांनी दिली.
Web Title: Blind women cricket tournaments to be played next month
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.