रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय सलग दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघ मैदानावर उतरला. ३ वन डे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी दिली गेली. दुसऱ्या वन डे सामन्यातही दोन स्टार प्लेइंग इलेव्हनबाहेर होते आणि भारताचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने त्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून जेव्हा प्रयोग करणे गरजेचे वाटेल, तेव्हा ते केले जातील अस स्पष्ट मत द्रविडने व्यक्त केले. पण, प्रयोग करण्याची वेळ निघून गेलीय, हे सत्य दुर्लक्षित करून चालणार नाही.
जरा २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीचा गोंधळ आठवूया... जवळपास दोन-अडिच वर्ष अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळला अन् स्पर्धेच्या तोंडावर त्याला वगळून 3D विजय शंकरला संधी दिली गेली... पुढे वर्ल्ड कप स्पर्धेत काय झालं हे सर्वांना माहित्येय. २०१९नंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहू लागले... MS Dhoni निवृत्त झाला... विराट कोहलीकडून नेतृत्व रोहित शर्माकडे गेले. श्रेयस अय्यर, शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत... आदी अनेक नवे खेळाडू संघात आले. पण, तरीही संघ अजूनही अस्थीर आहे. रोहित, विराट, हार्दिक पांड्या यांची जागा सोडल्यास वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ कसा असेल हे सांगणे निवड समितीला अवघड असेल...
वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ही वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीच्या दिशेने नेणारी पहिली मालिका होती. भले वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप पात्रता निश्चित केली नसली तरी त्यांच्याविरुद्ध तगडा संघ खेळवता आला असता. शिखर धवनकडे निवड समिती अन् संघ व्यवस्थापनाने काणाडोळाच केला आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याने ३७ सामन्यांत १३१३ धावा केल्या आहेत. तरीही तो संघाबाहेर आहे. रोहित व शिखर या जोडीने अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याच्याजागी शुबमनला संधी दिली गेलीय अन् त्यानेही २५ सामन्यांत १३३६ धावा करून निर्णय आतातरी योग्य ठरवला आहे. रोहित व शुबमन ही जोडी सलामीला खेळेल हे पक्कं जरी असलं, तरी त्याचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहेच.
विराट कोहलीनंतर फलंदाजीचा क्रम अनिश्चित...
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फिट आहे, परंतु त्यानंतर भारतीय संघाची गाडी गडगडताना दिसतेय.. श्रेयस अय्यर व लोकेश राहुल हे पुर्णपणे तंदुरुस्त आहेत, असे सांगितले जातेय खरं. पण, प्रत्यक्ष जोपर्यंत ते मैदानावर उतरून क्रिकेट खेळत नाही, तोपर्यंत त्यांचे वर्ल्ड कप खेळणे पक्कं समजलं जात नाही. त्यांना पर्याय म्हणून इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव हे रांगेत आहेत. इशान वगळल्यास संजू व सुर्या यांना फार संधी मिळालेली नाही आणि मिळालेल्या संधीवर त्यांना चांगली कामगिरी करता आलीही नाही. अय्यरने २०१९-२०२३ मध्ये ३६ सामन्यांत १४२१ धावा केल्या आहेत. लोकेश ( ३१ सामन्यांत १२८२ धावा) तंदुरुस्त झाल्यास, इशानचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान जाईल, हे निश्चित आहे. ऋतुराज गायकवाड हा संघात असतो, पण त्याला संधी दिलीच जात नाही. त्यात त्याची निवड ही आशियाई स्पर्धेसाठी केल्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघातून बाद झाला आहे.
फिरकीपटूंमध्ये शर्यत...
हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंचे वर्ल्ड कप संघातील स्थान निश्चित मानले जात होते. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल या फिरकीपटूंमध्ये वर्ल्ड कप संघातील स्थान पटकावण्यासाठी चढाओढ आहे. हा वर्ल्ड कप भारतात होतोय, म्हणजे फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या असणार हे निश्चित आहे. अशात अनुभवी आर अश्विनला संधी द्यायला हवी, असा एक वर्ग आहे. अश्विन बऱ्याच कालावधीपासून वन डे क्रिकेटपासून दूर आहे, परंतु तो संघासाठी हुकूमी एक्का ठरू शकतो.
जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीवर सर्व काही अवलंबून...
आयर्लंड दौऱ्यासाठी कालच बीसीसीआयने संघ जाहीर केला अन् जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवले गेले. सप्टेंबर २०२२ नंतर जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करतोय.. पाठीच्या दुखापतीमुळे तो बराच काळ बाहेर होता अन् न्यूझीलंडमध्ये जाऊन त्याने शस्त्रक्रियाही करून घेतली होती. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे आता सर्वांच्या नजरा आहे. भारतीय संघाच्या जलदगती गोलंदाजांच्या फळीचा तो पाठीचा कणा आहे. पण, सध्या हा 'कणा' तंदुरुस्त नाहीए... मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर हे तीन तगडे पर्यात आहेत आणि हार्दिक आहेच. पण, सर्व गणित जसप्रीतच्या फिटनेसवर अवलंबून आहे.
३६ सामने ३६ खेळाडू ....
५ ऑक्टोबरपासून वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि अजूनही भारताचे १५ खेळाडू निश्चित होताना दिसत नाहीत. २०२२ पासून ३६ सामने भारतीय संघ खेळला अन् त्यांनी ३६ खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे यापैकी किती जणांना संधी मिळतेय याची उत्सुकता आहे. त्या दृष्टीने आगामी आशिया चषक अत्यंत महत्त्वाचा आहे.
Web Title: Blog : How Team India win the World Cup? Even with 10 ODI matches left, Team India continues to experiment; Many questions remain unanswered
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.