- स्वदेश घाणेकर
वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानी संघाची कामगिरी ही नेदरलँड्स पेक्षाही 'टुकार' होत असल्याचे पाहायला मिळतेय. परवा तर अफगाणिस्तानने त्यांचा 'बँड' वाजवला. स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं तेव्हापासूनच पाकिस्तानी मीडियाने चेन्नईतील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामान्यावर रडारड सुरू केली होती. त्यांनाही माहीत होतं की फिरकीला पोषक खेळपट्टीवर पाकिस्तानची डाळ शिजणार नाही. शेवटी त्यांची भीती खरी ठरली आणि बाबर आजमची टीम हरली. आता तर उपांत्य फेरीत पोहोचायचे देखील यांचे वांदे झाले आहेत. पण या मानहानीकारक कामगिरीचे सर्व खापर बाबरवर फोडले जातेय.
कर्णधार म्हणून ही त्याची नैतिक जबाबदारी आहे, पण म्हणून तो एकटा याला जबाबदार नक्की नाही.. जगातील सर्वात घातक वेगवान गोलंदाज, नंबर वन फलंदाज, स्टार अष्टपैलू. असे दावा करत छाती ठोकून भारतात आलेल्या पाक संघाची ५६ इंची छाती हवेचा 'फुगा' निघाली. गोलंदाजाची अवस्था कुणीही या टपली मारा अशी आहे.. फलंदाज आज मी उद्या तू या तत्वावर परफॉर्मन्स देत आहेत. मोहम्मद रिझवान गरज तिथे उभा राहतोय, पण ऐन वेळी कचही खातोय. शादाब खानवर कोणी दाब दिलाय हेच कळत नाहीये.. शाहीन , हॅरीस यांची अवस्था पाकिस्तानी चाहत्यांनाही पाहवत नाहीये. नंबर १ फलाना डीमका बाबर प्रचंड दडपणाखाली खेळतोय हे त्याच्या कामगिरीतून दिसतेय..
आशिया चषक स्पर्धेतील अपयशानंतर बाबर प्रचंड खवळला आणि खेळाडूंना त्याने झापले. तेव्हा कर्णधार होण्याचे स्वप्न पाहणारा 'जावई' बाबरला उलट बोलला होता.. ड्रेसिंग रूममधील वादाची बातमी बाहेर आली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नेहमीप्रमाणे ये सब झूट हैं सांगितले... आताही अफगाणिस्तानविरुद्धच्या निकालानंतर अशीच बातमी आलीय आणि PCB सब चंगा हैं म्हणतेय... त्याचवेळी कर्णधार बदलाच्या हालचालीनी वेग पकडल्याचे दिसतेय.. काका- पुतणा जोडी पाकिस्तानची वाट लावतेय हे सर्वाना दिसतेय पण अळीमळी गुपचीळी अशी गोष्ट आहे... ड्रेसिंग रूममधील बातम्या लीक करणाऱ्या भाच्याला सिलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला मामा सांभाळतोय... हे सगळं असे असताना बाबर करेल तरी काय..
समजलं का खरा गेम कुठून सुरू झालाय?