Join us  

Blog : राहुल द्रविडला एकट्याला दोष देण्यात काय अर्थ? टीम इंडियाला ५ चुका वर्ल्ड कपमध्ये महागात पडणार

भारतीय संघाला मागील दोनेक वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही... वर्ल्ड कप स्पर्धेचा १२ वर्षांचा दुष्काळ यंदा संपवेल अशी अपेक्षा आहे, पण काही चुका केल्या आहेत आणि त्यात सुधारल्या नाही तर....

By स्वदेश घाणेकर | Published: August 17, 2023 2:18 PM

Open in App

- स्वदेश घाणेकर

आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आल्या तरीही भारताचा वन डे संघ निश्चित होताना दिसत नाही. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी चौथ्या क्रमांकाची भेडसावणारी समस्या आजही भारतीय संघाच्या मानगुटीवर बसली आहे. भारताला २०१३ नंतर आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. रवी शास्त्री यांच्यानंतर भारताचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ राहुल द्रविड संपवण्यात यशस्वी होईल असे वाटले होते, परंतु द्विदेशीय मालिका सोडल्यास भारतीय संघ परदेशात काही खास कामगिरी करू शकलेला नाही. 

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन फायनलमध्ये भारताला ( न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया) हार पत्करावी लागली. इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटीही गमावल्यानं मालिका बरोबरीत सुटली. मागच्या वर्षी आशिया चषक ( ट्वेंटी-२०) स्पर्धेत अंतिम फेरीतही पोहोचता आले नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून १० विकेट्सने दारूण पराभव. त्याशिवाय वेस्ट इंडिज ( ट्वेंटी-२०), बांगलादेश ( वन डे) आणि दक्षिण आफ्रिका ( कसोटी व वन डे) दौऱ्यावर पराभव झालेत. पण, म्हणून भारतीय संघाच्या उतरत्या आलेखाला द्रविडला एकट्याला जबाबदार धरणे चुकीचे आहे.

राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) मध्ये असताना युवा पिढीला घडवण्याचे काम योग्य रितीने पार पाडत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील संघाने वर्ल्ड कपही उंचावला अन् म्हणून BCCIचा तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीने द्रविडला सीनियर संघाची जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले. कुटुंबवत्सल द्रविड या जबाबदारीसाठी सुरूवातीला तयार नव्हता, परंतु गांगुलीसोबतच्या मैत्रीखातर तो तयार झाला. पण, त्याने ही जबाबदारी स्वीकारली त्याआधीपासून भारतीय संघामागे अडचणी लागणे सुरू झाले होते... 

वर्कलोड मॅनेजमेंट - भारतीय संघाचे व्यग्र वेळापत्रक पाहता खेळाडूंचं वर्कलोड मॅनेजमेंट होणे महत्त्वाचे आहे, परंतु यावेळी NCA कडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे पाहायला मिळतेय. भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले आहेत आणि द्रविडला सातत्याने वेगवेगळ्या खेळाडूंसह वेगवेगळ्या मालिकांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये आशिया चषक २०२२ आणि वर्ल्ड कप २०२२ चाही समावेश आहे. लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, दीपक चहर, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. 

कर्णधारांची अदलाबदल - राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारतीय संघाला सतत वेगवेगळ्या कर्णधारासह खेळावे लागले आहे. दुखापतग्रस्त खेळाडू अन् वर्क लोड मॅनेजमेंटमुळे हा बदल करावा लागला आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात तीन फॉरमॅटमध्ये ८ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला आहे.

सातत्याने बदल - वर्कलोड मॅनेज करण्यासाठी संघात सातत्याने बदल झालेले दिसले. विराट कोहली व रोहित शर्मा या सीनियर्सना सर्वाधिक विश्रांती दिली गेली. मोहम्मद शमीलाही विश्रांती देण्यात आली. रोहित व विराट यांच्याशिवाय भारताची अवस्था काय होऊ शकते, याची प्रचिती विंडीज दौऱ्यावर आली. 

संघ निवडीत सातत्य नसणे - राहुल द्रविड व निवड समितीवर आरोप केले जाऊ शकतोत. संजू सॅमसनला वेस्ट इंडिज दौऱ्यावर अपेक्षित पाठींबा मिळाला नाही आणि त्यालाच त्याच्या भूमिकेबाबत स्पष्ट सांगितले गेले नाही. वन डे क्रिकेटमध्ये अपयशी ठरूनही सूर्यकुमार यादवला सातत्याने संधी दिली गेलीय. आर अश्विनचे वन डे संघात पुनरागमन झाले, परंतु भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्याबाबत चित्र स्पष्ट नाही. मोहम्मद शमीही ट्वेंटी-२० संघाच्या प्लानमध्ये नव्हता, परंतु त्याला अश्विनसह ट्वेंटी-२० संघात खेळवले गेले.

 दीर्घकालीन दूरदृष्टीचा अभाव - आयपीएलच्या कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला १८ महिन्यांनी पुन्हा कसोटी संघात खेळवले अन् वेस्ट इंडिज दौऱ्यावर थेट उप कर्णधारपद दिले. आता पुढे तो कसोटी संघात दिसेल की नाही, यावरच शंका आहे. बुमराह, पंत, हार्दिक व चेतेश्वर पुजारा हे उप कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. पण, अजूनही रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण, याचे उत्तर सापडत नाहीए.. 

या सर्व समस्या असताना भारतीय संघाच्या अपयशाला सर्वस्वी राहुल द्रविडला जबाबदार धरणे चुकीचे ठरते... आता या अडथळ्यांवर मात करून टीम इंडिया आगामी आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेत कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App