- स्वदेश घाणेकर
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहेत. भारताचे पहिल्या टप्प्यातील सर्व सामने अमेरिकेत होणार आहे. तिथे आतापर्यंत फार क्रिकेट खेळलं गेलेलं नाही. ॲडलेडवरून भारत-पाकिस्तान सामन्याच्या मैदानासाठी खेळपट्टी आणली गेल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही तेथील खेळपट्टी कशी साथ देईल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. त्यामुळेच निवड समितीही संघ निवड करण्यापूर्वी वेट अँड वॉच या भूमिकेत आहे. सलामी, मधली फळी, यष्टीरक्षक-फलंदाज, ऑलराऊंडर, स्पिनर अन् जलदगती गोलंदाज या सर्व बाजूंवर काल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली, आजही ती अपेक्षित आहे.
सलामीसाठी रोहित शर्मा फिक्स आहे, त्याच्यासोबत विराट कोहलीला खेळवायचं की यशस्वी जैस्वालला? यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संजू, रिषभ, लोकेश अशी तिरंगी लढत आहे. ऑलराऊंडरसाठी हार्दिक, शिवम तर फिरकीसाठी रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र, रवी बिश्नोई हे चर्चेत आहेत. जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज पक्का आहे. त्यांना सोबतीला अर्शदीप, आवेश, मयांक यादव यापैकी कोण हा प्रश्न आहे. या सर्व चर्चेत एक नाव गुमनाम आहे... ते म्हणजे ऋतुराज गायकवाड.
आयपीएल २०२४ ला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी असाच एक अचंबित करणारा निर्णय CSK ने घेतला होता. रवींद्र जडेजाला कर्णधार करण्याचा. पण, सर जडेजाला हा भार पेलवला नाही अन् स्पर्धेच्या मध्यंतरात MS Dhoni ने सूत्र पुन्हा हाती घेतली. असंच काही ऋतुराजच्या बाबतीत घडू नये ही भीती सुरुवातीला वाटत होती. पण आता निर्धास्त झालो आहोत, कारण ऋतुराजने फक्त त्याचे नेतृत्व कौशल्य सिद्ध केले नाही; तर ही जबाबदारी पेलत असताना फलंदाजीतही सातत्य राखले. काल सनरायझर्स हैदराबाद या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने ५४ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ९८ धावांची खेळी केली. बरं त्याचा स्ट्राईक रेट १८१.४८ होता हे नमूद करायला हवं.
स्ट्राईक रेट हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण सुपरस्टार विराट कोहली याचं नाव त्यात आहे. विराट ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ५०० धावांसह अव्वल स्थानी आहे, परंतु त्याचा स्ट्राईक रेट हा १४७.४९ असा आहे. यावर हर्षा भोगले व सुनील गावस्कर यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, विराटने RCB vs GT सामन्यानंतर त्यांनाही उत्तर दिले. तो भाग बाजूला ठेवूया अन् मूळ मुद्यावर येऊ.
रोहित शर्मा जो ओपनर म्हणून फिक्स आहे, त्याची आयपीएलमधील कामगिरी ९ सामन्यांत ३११ धावा अशी झाली आहे. त्याने एक शतकही झळकावले आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट १९४ असा आहे. कर्णधार असल्याने रोहितची निवड पक्की आहे, परंतु त्याच्यासोबत कोण? विराट कोहली, लोकेश राहुल, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, अभिषेक शर्मा हे या शर्यतीत आहेत. रोज यापैकी किमान एकाचं तरी नाव वर्ल्ड कप संघासाठी समोर येतं. पण, कोणाच्याही तोंडावर ऋतुराज गायकवाड हे नाव येताना दिसत नाही. अनेकांच्या मते रोहित व यशस्वी ही लेफ्ट राईट, म्हणजेच उजवी-डावी जोडी सलामीला खेळायला हवी. पण, यशस्वीला ९ सामन्यांत १५४.६५ च्या स्ट्राईक रेटने २४९ धावा करता आल्या आहेत. इशान किशनचा विचार केल्यास, तो अडखळतोय. त्याला ९ सामन्यांत २१२ धावा करता आल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट १६५.६२ असा आहे. शुबमन गिल ( १० सामने, ३२० धावा, १४०.९६ स्ट्राईक रेट), विराट ( १० सामने, ५०० धावा, १४७.४९ स्ट्राईक रेट), KL Rahul ( ९ सामने, ३७८ धावा, १४४.२७ स्ट्राईक रेट), अभिषेक शर्मा ( ९ सामने, २८८ धावा, २१८.१८ स्ट्राईक रेट) हेही शर्यतीत आहेत..
वेस्ट इंडिज व अमेरिका येथील खेळपट्ट्यांचा अंदाज बांधला तर तिथे आक्रमक फटकेबाजीसोबतच कौशल्यपूर्ण फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता अधिक आहे. जो संघाला चांगली सुरुवात करून देण्यासोबत शेवटपर्यंत उभा राहून मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो. याचा विचार केल्यास लोकेश राहुल हा बाजी मारू शकतो. पण तो सध्या यष्टिरक्षक-फलंदाज या शर्यतीत संजू सॅमसनवर भारी पडतोय. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड हा सक्षम पर्याय समोर आहे, पंरतु त्याचा विचार केला जात नाही, हे दुर्दैव... ऋतुराज ९ सामन्यांत ४४७ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा मॅचच्या परिस्थितीनुसार वर-खाली राहिला असला तरी सध्याच्या घडीला तो १४९.४९ असा आहे. म्हणजेच विराटपेक्षा चांगला आहे.
मग अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात का नको? असा प्रश्न मनात उद्भवल्यास चुकीचा ठरणार नाही. उजवा-डावा हा खेळ म्हणजेच सलामीला एक डावखुरा व उजवा हाताने खेळणारा फलंदाज असायला हवा, हा हट्ट जरा बाजूला सारून सक्षम शिलेदार रोहितसोबत उभा करणे सध्या गरजेचे आहे. आशा करूयात की ऋतुराजचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विचार होईल.