IND vs PAK, Blind T20 World Cup 2024: पुढच्या वर्षी Champions Trophy 2025 मध्ये पाकिस्तानला यजमानपद मिळवण्याबाबत वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान, भारत सरकारने पाकिस्तानला पहिला धक्का दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय संघाला अंध T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. अशा परिस्थितीत अंध भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकातून माघार घेतली आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) चे सहाय्यक सचिव शेलेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.
गृह, परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी नाही
अंध T20 क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे. ही स्पर्धा २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. यासाठी क्रीडा मंत्रालयाने भारतीय अंध संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली होती. मात्र येथेही हे प्रकरण शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित होते. क्रीडा मंत्रालयाची परवानगी पुरेशी नव्हती. भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यासाठी गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही परवानगी आवश्यक होती. या दोनही मंत्रालयाने त्यांना अंध संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी दिलेली नाही.
अंध T20 विश्वचषक भारताशिवाय होणार
अलीकडेच पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (PBCC) ने सांगितले होते की, हा T20 विश्वचषक भारतीय संघाशिवाय वेळापत्रकानुसार पाकिस्तानमध्ये खेळवला जाईल. पीबीसीसीचे अध्यक्ष सय्यद सुलतान शाह यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतीय संघासाठी व्हिसा जारी केला होता, परंतु भारत सरकारने स्वतः संघ पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा भारताशिवाय खेळवली जाईल. "इतर सर्व संघ अंध T20 विश्वचषकासाठी येत आहेत. जर एक संघ आला नाही तर त्याचा आमच्या तयारीवर परिणाम होणार नाही. विश्वचषक भारताशिवाय नियोजित वेळापत्रकानुसार खेळवला जाईल", असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.