Big Blow to SRH, IPL2022: गुजरात टायटन्सने सलामीचे तीन जिंकून अप्रतिम सुरूवात केली होती. पण अखेर सोमवारी गुजरातला पराभवाचे तोंड पाहावे लागले. सनराजयर्स हैदराबादने हंगामातील सलग दुसरा सामना जिंकत गुजरातचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केन विल्यमसनने ५७ धावांची दमदार खेळी करत हैदराबादला विजय मिळवून दिला. पण या दमदार विजयानंतर हैदराबादच्या संघाला एक मोठा धक्का बसला असून त्यांचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
SRH ला मोठा धक्का
हैदराबाद-गुजरात सामन्यादरम्यान अनुभवी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. त्यामुळे त्याला सामन्यातील चार षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. एकूण तीन षटके टाकत त्याने १४ धावा दिल्या, पण त्याला विकेट घेता आली नाही. त्याच्या दुखापतीबाबत, सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले की, सुंदरला उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये आणि पहिल्या बोटाच्या मध्यभागी दुखापत झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार आहोत. आशा आहे की बळावणार नाही. पण त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्यास किमान एका आठवड्याचा कालावधी लागेल.
वॉशिंग्टन सुंदरला पर्याय काय?
सनरायजर्सला त्यांच्या पुढील दोन सामन्यांमध्ये शुक्रवारी आणि रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जचा सामना करावा लागणार आहे. चालू हंगामात सनरायजर्सने सुंदरला अष्टपैलू खेळाडू म्हणून नव्हे तर फिरकीपटू म्हणून स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सुंदरच्या जागी श्रेयस गोपालचा पर्याय उपलब्ध आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या सामन्यात सुंदरला ४७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांमध्ये त्याने कंजुष गोलंदाजी करत, ११ षटकांत ६३ धावा देऊन ४ गडी बाद केले आहेत.