भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि अध्यक्षीय एकादश यांच्यात झालेल्या तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित राहिला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डाव 6 बाद 279 धावांवर घोषित केला, प्रत्युत्तरात अध्यक्षीय एकादश संघाने 8 बाद 265 धावा केल्या. कसोटीत प्रथमच सलामीला येण्यासाठी उत्सुक असलेल्या रोहित शर्माला सराव सामन्यात अपयश आले. पण, प्रियांक पांचाळ, सिद्धेश लाड आणि श्रीकर भरत यांनी अर्धशतकी खेळी करत सराव सामन्याचा अखेरचा दिवस गाजवला.
तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसात फॅफ ड्यु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्कराम ( 100), टेंबा बवुमा ( 87*) आणि वेर्नोन फिलेंडर ( 48) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेनं 6 बाद 279 धावांत डाव घोषित केला. धमेंद्रसिंग जडेजानं ( 3/66) सर्वाधिक विकेट घेतल्या.
त्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. रोहित आणि मयांक अग्रवाल हे सलामीला आले. सलामीवीर म्हणून कसोटीत रोहितची कामगिरी कशी होते याची उत्सुकता होती. पण, दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित खाते न उघडता माघारी परतला. फिलेंडरने त्याला क्लासेनकरवी झेलबाद केले. मयांकही 39 धावांत माघारी परतला. पण, प्रियांक ( 60), सिद्धेश ( 52*) आणि श्रीकर ( 71) यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाची पडझड थांबवली. फिलेंडरने दोन विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू केशव महाराजने 3 विकेट्स घेतल्या.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
Web Title: Board President's XI and South Africa : The match between South Africa & the India Invitational XI is drawn
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.