मुंबई : कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आल्यावर देशांतर्गत सत्र पुन्हा सुरू करण्यासाठी बोर्ड नवीन योजना तयार करेल, असे भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. देशभरात कोविड-१९ च्या संसर्गामुळे बीसीसीआयने मंगळवारी रणजी चषकासह सर्व मोठे सामने स्थगित केले आहे. रणजी चषक या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार होते.
गांगुली यांनी राज्य संघटनांना पत्र लिहिले आहे. यात म्हटले की, कोविड-१९ मुळे देशांतर्गत स्थिती खराब असल्याने सध्याच्या सत्रातील सर्व सामने थांबवावे लागले. रणजी आणि सी. के. नायडू चषक याच महिन्यात सुरू होणार होते, तर वरिष्ठ महिला टी २० लीग फेब्रुवारीत आयोजित करण्यात आली होती. गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांचे अध्यक्ष व सचिवांना ई-मेल केला आहे. त्यात म्हटले की, कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक संघ पॉझिटिव्ह येत असल्याने खेळाडू, अधिकारी व स्पर्धा संचलित करणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
गांगुली यांनी म्हटले की, देशांतर्गत सत्र पुन्हा सुरू करण्यासाठी बोर्ड सर्वकाही करेल. त्यांनी सांगितले की, बीसीसीआयला आश्वस्त करत आहे की, कोविड-१९ ची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी कटिबद्ध आहे. बोर्ड लवकरच याबाबत नवीन योजना तयार करून राज्य संघटनांशी संपर्क करेल. बंगाल संघाचे सात सदस्य आणि भारतीय संघाचा अष्टपैलू शिवम दुबेसोबत मुंबईचे व्हिडीओ विश्लेषक रणजी चषक स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच कोविड १९ ने पॉझिटिव्ह आले होते. ही स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती. या महामारीमुळे २०२०-२१ च्या सत्राचेदेखील आयोजन होऊ शकले नाही.