IPL 2022 Auction: यंदाच्या हंगामासाठी आज आणि उद्या बंगळुरूमध्ये लिलाव सुरू आहे. यंदा स्पर्धेत १० संघ खेळणार असून दोन नवे संघ हंगामात आले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांना समान संधी मिळावी यासाठी यंदाच्या हंगामात तब्बल ६०० खेळाडू लिलावाच्या मैदानात उतरले. त्यामुळे साऱ्यांचीच नजर या खेळाडूंवर होती. तसं असतानाही एका तरूणीने पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ती तरूणी म्हणजे सनरायजर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी काव्या मारन.
दोन दिवसीय लिलावासाठी आयपीएल मधील दहा संघाचे मालक व सहमालक यांच्यासह प्रत्येक संघाचे प्रशिक्षक संघाला आवश्यक असणाऱ्या खेळाडूंवर बोली लावत होते. या लिलावादरम्यान काव्या मारन एन्ट्री करतानाचा फोटो व्हायरल झाला. याआधी गेल्या हंगामात तिचा खेळाडूंवर बोली लावतानाचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच तिचा एक वेगळा चाहतावर्ग झाला होता. हैदराबाद संघाकडून लिलावादरम्यान संघाच्या कोचिंग स्टाफसोबत काव्या मारनदेखील उपस्थित होती. त्यामुळे 'ती पुन्हा आली अन् तिनं जिंकलं' असं वातावरण पाहायला मिळालं.
दरम्यान, SRH च्या संघाने लिलावाआधी तीन खेळाडू रिटेन केले होते. केन विल्यमसनला १४ कोटींच्या रकमेवर संघाने कायम ठेवले. जम्मू काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल समद आणि वेगवान नवखा गोलंदाज उमरान मलिक या दोघांनाही प्रत्येकी ४-४ कोटींना संघात रिटेन केले. त्यामुळे आता यंदाच्या हंगामात SRH चा संघ आणखी कोणते खेळाडू संघात दाखल करून घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.