- सुकृत करंदीकर
१८७७ मध्ये क्रिकेटमधला पहिला कसोटी सामना खेळला गेला. पुढची ९४ वर्षं क्रिकेटमध्ये शून्य बदल झाले. या काळात फक्त कसोटी क्रिकेटच होतं. कधी सात दिवसांचं, कधी सहा-चार आणि सरतेशेवटी पाच दिवसांचं. मग १९७१ मध्ये सुरु झालं एकदिवसीय क्रिकेट. पाच दिवसांचा सामना एकदम ‘वनडे’ झाल्यानंतर अर्थातच क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. रंगबेरंगी कपडे, दिवसरात्रीचे सामने, विश्वचषक असेबरेच बदल ‘वनडे’त होत गेले यामागं प्रामुख्यानं टीव्ही आल्याची पा र्श्वभूमी होती. थेट प्रक्षेपण, जाहिराती व त्यासाठी वेगवेगळा मसाला यामुळं क्रिकेटचे प्रेक्षक तर वाढलेच शिवाय हा खेळ श्रीमंतही होत गेला. नव्वदच्या दशकानंतर हे सगळंसुद्धा अपुरं पडू लागलं. क्रिकेटचा जन्मदात्या इंग्लंडनं यावर एक प्रयोग करुन पाहिला. स्थानिक क्रिकेटमध्ये २००३ मध्ये वीस-वीस षटकांचा सामना खेळवला.
क्रिकेटचा हा सर्वात ‘शॉर्ट’ प्रकार क्रिकेट चाहत्यांना भलताच आवडला. दिवसभराची कामं उरकून संंध्याकाळी बियरचे चषक रिते करत मित्रपरिवारासोबत तीन-तास खुल्या मैदानात निवांतपणे घालवणं हे बार-पबमध्ये गर्दी करण्यापेक्षा जास्त रोमांचकारी वाटू लागलं. ‘टी-ट्वेन्टी’जोरदार चालणार याची झलक इंग्लंडमध्ये दिसली आणि दोनच वर्षात २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामना खेळला गेला. २००७ मध्ये तर लगेच टी-ट्वेन्टीचा वर्ल्ड कपही झाला. या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांना युवराजचे एका षटकातले सहा उत्तूंग षटकार, सुपर ओव्हर असली आश्चर्यकारक कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर ‘टी ट्वेन्टी’नं मागं वळून पाहिलेलं नाही. कसोटी, वनडेपेक्षाही अत्यल्प वेळेत जास्त ‘धंदा’ करणारा, लोकप्रियता मिळवून देणारा, प्रेक्षक संख्या लाभणारा क्रीडा प्रकार म्हणून प्रायोजक, जाहिरातदारांनी आणि विशेेष म्हणजे विविध देशांच्या क्रिकेट मंडळांनीही ‘टी-ट्वेन्टी’ला डोक्यावर घेतलंय. भारतानं सुरु केलेली आयपीएलसर्वाधिकश्रीमंत क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. भारतापाठोपाठ कँरेबियन बेटं, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आदी देशांमध्येही टी-ट्वेन्टी स्पर्धांचं पीक जोमानं उगवतं आहे.
९४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटनं ‘वनडे’च्या रुपानं पहिला बदल अनुभवला तेव्हा अनेकांनी त्याला नाकं मुरडली होती. क्रिकेटची कलात्मकता, गुणवत्ता वनडे घालवणार अशी ओरड त्यावेळी झाली होती. १९७१ नंतर ३४ वर्षांनी टी-ट्वेन्टी सुरु झालं तेव्हाही हेच रडगाणं गायलं गेलं. ही ओरड अगदीच दुर्लक्ष करण्याजोगीनाही. खेळ अधिक रंजक करण्याच्या नादात फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातल्या स्पर्धेचं संतुलन टी-ट्वेन्टीच्या बदललेल्या नियमांनी घालवलं आहे. क्रिकेट हा तसा कायमच फलंदाजांच्या बाजूचा खेळ राहिला आहे. पण आताचं वनडे आणि टी ट्वेन्टी हे जास्तच फलंदाजधार्जिणं बनलं आहे. पण यामुळं क्रिकेटचा वेग वाढवला. कसोटी सामनेही निकाली निघण्याचंही प्रमाण कधी नव्हे इतकं वाढलं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा असा की ‘सुपरमँन’नंही तोंडात बोट घालावं. अव्वल खेळाडूंची तंदुरुस्ती शंभर-दोनशे मीटर धावणाऱ्या ‘रनर्स’च्या तोडीची. षटकार-चौकारांची बरसात इतकी धुव्वाधार की कोणतंच ‘टार्गेट’ अशक्य वाटू नये.
पण या सगळ्यापेक्षाही टीट्वेन्टीनं घडवलेला सर्वात मोठा बदल कोणता तर तो म्हणजे ‘संधी’ हा होय. टीट्वेन्टीनं क्रिकेटपटुंपुढं प्रचंड संधींचा पेटाराच उघडला. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या खेळाडूला अल्पावधीत ‘इंटरनँशनल’ करण्याचं आणि राष्ट्रीय संघाचा दरवाजा उघडून देण्याची ताकद ‘टीट्वेन्टी’त आहे. आता बहुतेक सगळेच देश कसोटी, वनडे आणि टीट्वेन्टी या तीन प्रकारांसाठी तीन स्वतंत्र संघ तयार ठेवतात. त्यामुळं संघात जागा मिळवण्यातच जिंदगी गेली, असं आता सहसा घडत नाही. दर्जा असेल तर कुठं ना कुठं संधी मिळतेच. म्हणून तर जसप्रित बुमराह सारखा गोलंदाज ‘मुंबई इंडियन्स’मधून थेट भारतीय संघात आला आणि आता जगातला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गाजतोय. हार्दिक पंड्या, पोलार्ड, मँक्सवेल, जोफ्रा आर्चरसारख्या शेकडो क्रिकेटपटूंचं करिअर टी-ट्वेन्टीमुळंच घडलं आहे. १३० कोटींच्या क्रिकेटवेड्या भारतात पृथ्वी शॉ, शुभमन गिल, संजू सँमसन, श्रेयस अय्यर, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कमलेश नागरकोट्टी, शिवम मावी, वॉशिंग्टन सुंदर, नटराजन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे कधी उघडले असते? राष्ट्रीय संघात येण्याआधीच प्रसिद्धी, पैसा आणि प्रतिष्ठेच्या कोंदणात नवख्या क्रिकेटपटूंना बसवण्याचं श्रेय टीट्वेन्टीचंच. तंदुरुस्ती,कलात्मकता, दर्जा यांची परिमाणं नव्यानं निश्चित करावी लागतील इतकंच. कसोटीतल्या शालीनतेचं कौतुक आहेच पण म्हणून टीट्वेन्टीतल्या ‘बोल्डनेस’ला नाकं का मुरडावीत? ‘व्हॉट नेक्स्ट फाईव्ह-जी,’ असं विचारणाऱ्या वेगवान तरुणाईला क्रिकेटकडं खेचायचं तर जुन्या कसोटीचे मापदंड टीट्वेन्टीला लावून चालणार नाही.
बास्केटबॉल, फुटबॉल, टेनिस यासारख्या जेमतेम तीन-चार तासात संपणाऱ्या खेळांच्या लोकप्रियतेची तीव्र स्पर्धा क्रिकेटला आहे. दिवसभर खेळल्यानंतरचा किंवा पाहिल्यानंतरचा आनंद, थरारकता, झिंग, रोमांच हे सगळं तीन-चार तासात मिळवायचं तर ‘टीट्वेन्टी’ला पर्याय नाही.
Web Title: 'Bold' cricket in the world of '5G'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.