आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स.हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. खरे तर रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे कुठेतरी हार्दिक विरूद्ध रोहित असे चित्र तयार करण्यात आले. पण, ट्वेंटी-२० विश्वचषकातील विजयानंतर हार्दिक पांड्या नायक झाला. मात्र, आयपीएल २०२४ दरम्यान झालेल्या घटना म्हणजे हार्दिक पांड्यासाठी एक वाईट स्वप्नच. चाहत्यांनी हार्दिक दिसताच त्याला ट्रोल केले, त्याच्यासमोर रोहित-रोहित अशा घोषणांचा पाऊस पाडला. याबद्दल विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपापली मतं मांडली आहेत.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि साकिब सलीम यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबद्दल पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारला असता रितेशने असे उत्तर दिले जे चाहत्यांना अपेक्षित नसेल. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांपैकी मुंबईचा राजा कोण? या प्रश्नावर व्यक्त होताना रितेशने भारी उत्तर दिले.
कठीण प्रश्नाचे उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला की, हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा सध्याचा कर्णधार असला तरी रोहित शर्माला नेहमीच मुंबईचा खरा राजा मानला जाईल. मात्र, या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी रितेशने सचिन तेंडुलकरलाही मुंबईचा राजा म्हटले.
अलीकडेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हार्दिक आणि रोहितबद्दल भाष्य केले होते. त्याने सांगितले की, हार्दिकला सर्व सहकारी खेळाडू पाठिंबा देत होते. नवनिर्वाचित कर्णधाराच्या नेतृत्वात संघ कशी चांगली कामगिरी करेल यावर चर्चा सुरू होती. पण, काही गोष्टी आमच्या नियंत्रणाच्या बाहेर होत्या, त्या जगजाहीर असून कोणीच यावर तोडगा काढू शकले नाही. क संघ म्हणून आम्ही कोणत्याच एका खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही तिथे एकमेकांसाठी उभे असतो. संघातील सर्वच खेळाडू एकमेकांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. मी हार्दिकसोबत खूप क्रिकेट खेळले आहे. तेव्हा दोघेही खूप युवा होतो असे मी म्हणेन. आम्ही एकत्र होतो आणि गरज पडेल तेव्हा एकमेकांना मदत करत होतो.