MI vs KKR, arjun tendulkar । मुंबई : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान मुंबईच्या संघाने सांघिक खेळी करून विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकांत ६ बाद १८५ धावा केल्या. पाहुण्या संघाकडून व्यंकटेश अय्यरने ५१ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली. ९ षटकार आणि ६ चौकार ठोकून अय्यरने मुंबईसमोर १८६ धावांचे तगडे आव्हान ठेवले. पण अय्यरच्या शतकापेक्षा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुने तेंडुलकरमुळे रविवारचा सामना चर्चेत राहिला. कारण ३ वर्षे मुंबईच्या संघासोबत राहिल्यानंतर अखेर रविवारी अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली.
दरम्यान, पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने २ षटके टाकली त्यात त्याने १७ धावा दिल्या पण बळी घेण्यात यश आले नाही. अर्जुनच्या पदार्पणानंतर विविध क्षेत्रातील दिग्गज ज्युनिअर तेंडुलकरला शुभेच्छा देत असून त्याचे अभिनंदन करत आहेत. खरं तर रविवारच्या सामन्यात केकेआरकडून अय्यर व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अय्यरने शतक झळकावले पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने अर्जुन तेंडुलकरला शुभेच्छा देताना म्हटले, "हे आयपीएल खूप स्पर्धात्मक आहे. पण जेव्हा तुम्ही आपल्या मित्राचा मुलगा मैदानात उतरताना पाहता तेव्हा ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अर्जुनला खूप खूप शुभेच्छा आणि सचिन तेंडुलकरसाठी काय ही अभिमानाची बाब आहे. मस्तच." अशातच शाहरूख खानच्या शुभेच्छांचे आभार 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरने मानले आहेत. सचिनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघाच्या जर्सीमध्ये सोन्याचे धागे आहेत. पण तुझे हृदय 100% सोन्याचे आहे, शाहरूख."
मुंबईचा मोठा विजय
मुंबई इंडियन्सच्या संघाने सांघिक खेळी करून विजय साकारला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने कर्णधारपद सांभाळले. इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात रोहित शर्माचे खेळपट्टीवर आगमन झाले अन् त्याने १३ चेंडूत २० धावांची छोटी खेळी केली. सुयश वर्माने हिटमॅनला बाद करून यजमान संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावताना २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव (४३) आणि तिलक वर्मा (३०) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. अखेरच्या काही षटकांमध्ये टीम डेव्हिडने १३ चेंडूत २४ धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मुंबईने १७.४ षटकांत ५ बाद १८६ धावा करून मोठा विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Bollywood actor Shah Rukh Khan congratulates Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar after making his IPL debut and now sachin reply to king khan in golden words
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.