२०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला अन् क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा व्यासपीठावर तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचा थरार रंगणार आहे. अशातच शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा करताना २०३६ चे ऑलिम्पिक देशात आयोजित करण्याच्या प्रयत्नात भारत कोणतीही कसर सोडणार नाही असे म्हटले. आपल्या देशात ऑलिम्पिकचे आयोजन व्हावे हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न असून हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारची कटिबद्धता निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची (IOA) संयुक्त समिती लवकरच २०३६ ची स्पर्धा भारतात होण्याच्या दृष्टीने योजनेची रूपरेषा आखण्यासाठी एक बैठक बोलावेल. खरं तर २०३६ ऑलिम्पिकसाठी यजमान देशाचा निर्णय पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) निवडणुकीनंतर घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मान्यतेनंतर अखेर मोठ्या कालावधीनंतर २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटचा थरार रंगेल, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ असतील. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या ऐतिहासिक निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा थरार क्रिकेटशिवाय बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या चार खेळांना देखील ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामुळे ऑलिम्पिक खेळांमध्ये अधिक विविधता वाढली आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या भारताच्या संधींबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच यामुळे भारताच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.
शाहरूख म्हणाला की, ऑलिम्पिकचे आयोजन केल्याने भारताच्या क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळेल. यामुळे कपिल देव आणि जसप्रीत बुमराह यांसारखी गोलंदाजी करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. २०३६ च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील आहे. हा निर्णय भारताच्या बाजूने लागला तर ती संपूर्ण देशासाठी नक्कीच अभिमानाची बाब असेल.