इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थगित करावे लागले. त्यानंतर बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांकडे जाण्यास सांगितले आहे. परदेशी खेळाडूंसमोर मायदेशात जाण्याचे आव्हान होते. त्यात ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतातून येणाऱ्या विमानसेवा १५ मे पर्यंत रद्द केल्यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवचा आसरा घ्यावा लागला आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) यानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी सोनू सूदला मदतीसाठी मॅसेज केल्याचे दाखवण्यात आले आहे. सोनूच्या फॅननं हा फोटो काढला आहे आणि अभिनेत्यानं तो ट्विट करून त्यावर हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. सोनूची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK ) स्टार फलंदाज सुरेश रैनाने गुरुवारी सोशल मीडियावर ऑक्सिजन सिलिंडरसाठी विनंती केली, त्यामुळे बरेच लोक मदतीसाठी पुढे आले. सोनू सूदने रैनाला तातडीने तपशील पाठवण्याची मागणी केली आणि मदत केली. सुरेश रैनानं त्याचे आभारही मानले. देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी सोनू सोदूनेदेखील पुढाकार घेतला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. जसे जमेल तशी सोनू सूद प्रत्येकाला मदत करताना दिसतोय. गेल्या वर्षभरापासून तो फक्त 5 तास झोपतो आणि 18 तास काम करतोय.