महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला २३ तारखेपासून सुरूवात होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील स्पर्धेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआय एक शानदार उद्घाटन सोहळा आयोजित करणार आहे. त्यात बॉलिवूडचा तडका असणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात कार्तिक आर्यन, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर, वरूण धवन आणि शाहरूख खान परफॉर्म करताना दिसणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार कार्तिक आर्यन, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर, वरूण धवन आणि शाहरूख खान परफॉर्म करताना दिसणार आहेत. गेल्या वेळी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन सारख्या स्टार्सने उद्घाटन समारंभात परफॉर्म केले होते. त्याचवेळी गायक एपी धिल्लन यांनी आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती.
WPL च्या उद्घाटनात 'बॉलिवूडचा तडका'महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम २३ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळवला जाईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही एकूण पाच संघ २२ सामने खेळणार आहेत. मात्र, यावेळी मोठा बदल करण्यात आला आहे. खरं तर मागील वर्षी ही लीग मुंबई आणि नवी मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवण्यात आली होती. मात्र, यावेळी या लीगचे यजमानपद मुंबईऐवजी बंगळुरू आणि दिल्लीला देण्यात आले आहे.
स्पर्धेच्या सुरूवातीचे ११ सामने बंगळुरूमध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर पाचही संघ दिल्लीला जातील, जिथे एलिमिनेटरसह अंतिम सामना खेळवला जाईल. साखळी फेरीत २० सामने खेळवले जातील. साखळी फेरीत अव्वल राहणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर सामना खेळतील. २४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकही डबल हेडर सामना खेळवला जाणार नाही. दररोज एकच सामना होईल. १५ मार्चला एलिमिनेटर आणि १७ मार्चला अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल.