भारताच्या पुरूष क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी करताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. तब्बल ११ वर्षांनंतर भारतात आयसीसी ट्रॉफी आली आहे. आगामी काळात महिलांचाही विश्वचषक होणार आहे. त्यामुळे भारताच्या महिला क्रिकेट संघाकडूनही चाहत्यांना आयसीसी ट्रॉफीची आशा आहे. अशातच बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी भारतीयांची इच्छा बोलून दाखवली. तसेच या जोडप्याने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघाला शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात भारताचा महिला संघ आशिया चषक आणि त्यानंतर विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा खेळणार आहे. 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना सिद्धार्थ आणि कियाराने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. कियाराने भारतीय संघाचे कौतुक करताना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही चांगली कामगिरी कराल याची खात्री आहे, असे कियाराने सांगितले. दोघांनी खासकरून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या खेळीला दाद दिली.
आशिया चषकासाठी भारताचा संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग.
भारत आशिया चषकाच्या स्पर्धेसाठी अ गटात आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होईल. १९ जुलै रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होईल, तर भारताचा दुसरा सामना २१ जुलैला यूएईसोबत होईल. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडिया २३ जुलै रोजी नेपाळशी भिडेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवले जातील.
आशिया चषकातील भारताचे सामने -१९ जुलै - भारत विरूद्ध पाकिस्तान२१ जुलै - भारत विरूद्ध यूएई२३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ
दरम्यान, महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. बांगलादेशची राजधानी ढाका आणि सिल्हेट येथे हे सामने खेळवले जातील. एकूण दहा संघ १८ दिवसांत २३ सामने खेळतील. कट्टर प्रतिस्पर्धी अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असेल.
विश्वचषकातील भारताचे सामने -४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर ११३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया