दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल २०२३ मध्ये व्यग्र असलेल्या पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पृथ्वीचा संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दिल्लीने सलग चार सामने गमावले असून ते पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. पृथ्वीही खराब फॉर्मशी झुंजत आहे. दरम्यान, पृथ्वीविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. सपना गिल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सलामीवीरविरुद्ध नोटीस बजावली आहे.
फेब्रुवारीमध्ये पृथ्वी आणि सपना गिलमध्ये सेल्फीवरून वाद झाला होता. सपनावर पृथ्वीवर बेसबॉलने हल्ला केल्याचा आणि ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली. जामिनावर सुटल्यानंतर सपनाने भारतीय क्रिकेटपटूवर प्राणघातक शस्त्राने हल्ला आणि विनयभंग केल्याचा आरोप केला.
सपनाने पृथ्वीविरुद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी सपनाने तिच्याविरुद्धचा गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. सपनाच्या याचिकेवर पृथ्वी , त्याचा मित्र आणि काही पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण फेब्रुवारीमध्ये पृथ्वी त्याच्या मित्रांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेला होता, जिथे सपना आणि तिच्या एका मैत्रिणीने त्याला सेल्फीसाठी त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत पृथ्वीने हॉटेल मॅनेजरकडे तक्रार केली, त्यानंतर सपना आणि तिच्या मैत्रिणीला हॉटेलबाहेर फेकण्यात आले. यामुळे संतापलेल्या सपनाने भारतीय क्रिकेटर हॉटेलमधून बाहेर येताच गोंधळ घातला. त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गाडीचा पाठलाग केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"