जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग म्हणजे आयपीएल. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अशातच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंसाठी एक मोठी घोषणा केली. आता क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी तब्बल ७.५ लाख रुपये दिले जातील. तसेच एका हंगामातील सर्व लीग सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त १.०५ कोटी रुपये मिळतील. प्रत्येक फ्रँचायझी एका हंगामात मॅच फी म्हणून १२.६० कोटी रुपयांचे वाटप करेल.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक ऐतिहासिक घोषणा करताना खेळाडूंना खुशखबर दिली. आयपीएल लिलावात बहुतांश खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळत असतात. आता त्यांना मॅच फीच्या रुपातही मानधन मिळेल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना जय शाह म्हणाले की, इंडियन प्रीमिअर लीगमधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात येत आहे. आम्हाला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, आमच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी मॅच फी म्हणून ७.५ लाख रुपये दिले जातील. प्रत्येक फ्रँचायझी मॅच फी म्हणून एका हंगामासाठी १२.६० कोटी रुपये खर्च करेल. IPL आणि आमच्या खेळाडूंसाठी हे एक नवीन युग आहे.