Join us  

'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत

Border Gavaskar Trophy 2024: याआधी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर गावसकर ट्रॉफी सलग दोनदा जिंकण्यात भारताला यश आले. मात्र आगामी मालिकेत भारतीय संघ चार कसोटी सामने जिंकू शकणार नाही, असे धक्कादायक भाकीत दिग्गज सुनील गावसकर यांनी केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 6:04 AM

Open in App

नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला घरच्या मैदानावर ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघाची ऑस्ट्रेलियात परीक्षा होईल. तेथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी पाच कसोटी सामने खेळणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर गावसकर ट्रॉफी सलग दोनदा जिंकण्यात भारताला यश आले. मात्र आगामी मालिकेत भारतीय संघ चार कसोटी सामने जिंकू शकणार नाही, असे धक्कादायक भाकीत दिग्गज सुनील गावसकर यांनी केले.

गावसकर यांनी ही भविष्यवाणी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केली आहे. भारतीय संघाने आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलऐवजी बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका जिंकण्यावर भर द्यावा, असे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, 'मला वाटत नाही की भारत ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत करू शकेल. तसे झाले तर ती एक मोठी उपलब्धी असेल; परंतु सध्या भारतीय संघाकडून अपेक्षा बाळगणे योग्य नाही. माझ्या मते, संघाने फक्त जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मालिका १-०, २-० किंवा ३-१ अशी जिंकल्यास संघाच्या कामगिरीत स्थिरता येईल आणि चाहत्यांनाही संघाचा अभिमान वाटेल.' आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या फायनलसाठी भारतीय संघाला बॉर्डर गावसकर ट्रॉफी ४-० ने जिंकावी लागेल. भारत याआधी दोनदा डब्ल्यूटीसी गरज फायनल खेळला आहे आणि तिसऱ्यांदा  फायनलमध्ये पोहोचणे एक मोठी उपलब्धी असेल; पण यावेळी संघाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे, कारण इतर देशांच्या निकालांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. गावसकर यांच्या मते, भारतावर मालिका जिंकण्यासाठी नक्कीच दबाव असेल; पण त्यांना हेदेखील समजून घ्यावे लागेल की, ४-० असे जिंकणे केवळ अवघड नाही. तर आवाक्याबाहेरचेदेखील आहे. त्यासाठी वास्तविकता ध्यानात घेत लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

बुमराहसाठी खेळपट्टी तयार करा...भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पुणे व मुंबईत फिरकीपटूंना साथ देणारी खेळपट्टी तयार केली; पण हा डाव यजमानांवरच उलटला. न्यूझीलंडने मालिका खिशात घालून भारताचे डब्ल्यूटीसी फायनलचे समीकरण बिघडवले. भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराहसारखा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी खेळपट्टी तयार करायला हवी, असे गावसकरांना वाटते. तें म्हणाले, 'तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहे. नव्या चेंडूवर तो भल्या भल्या फलंदाजांना चाचपडायला लावतो. मग त्याच्यासाठी खेळपट्टी तयार करायला हवी, ज्याचा त्याला आणि संघालाही लाभ होईल.

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा