ricky ponting on border gavaskar trophy : २२ नोव्हेंबरपासून होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाची 'कसोटी' असेल यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात जाऊन पराभवाची धूळ चारण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. अलीकडेच भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने यजमानांचा ३-० ने दारुण पराभव केला. बंगळुरू, पुणे आणि मग मुंबईत झालेल्या अखेरच्या सामन्यातही भारतीय खेळाडू सपशेल अपयशी ठरले. या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मोठा संघर्ष करावा लागेल. आगामी काळात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळेल. यातील चार सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. (Ricky Ponting Prediction On Border Gavaskar Trophy)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका म्हणजे क्रिकेट विश्वासाठी पर्वणी असते. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आगामी मालिकेबाबत भाकीत केले असून त्याच्या मते मालिकेचा निकाल काय असेल हे सांगितले. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरीही पाँटिंगच्या भाकितावरून निश्चित झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेबद्दल भाकीत करताना पाँटिंगने सांगितले की, मोहम्मद शमी नसताना टीम इंडियासमोर कसोटीत २० बळी घेण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे मला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा निकाल ३-१ असा दिसत आहे. यजमान ऑस्ट्रेलिया तीन सामने जिंकेल आणि पाहुणा संघ भारत एक सामना जिंकेल.
'आयसीसी'शी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने म्हटले की, भारतीय संघात मोहम्मद शमी नसल्याने त्यांना एक मोठा फटका बसू शकतो. मागील काळात चर्चा होती की शमी तंदुरुस्त होईल पण तसे झाले नाही. त्यामुळे भारताला एका सामन्यात २० बळी घेणे कठीण होईल. मला वाटते की पाच कसोटी सामन्यांमध्ये भारत कुठेतरी एक कसोटी सामना जिंकेल. ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत असून, त्यांना त्यांच्या मायदेशात पराभूत करणे एवढे सोपे नाही. म्हणून या मालिकेचा निकाल ३-१ असा लागेल असे मला वाटते.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.