Boria Majumdar vs Wriddiman Saha : भारताच्या कसोटी संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला धमकीचे मेसेज पाठवणारे ज्येष्ठ पत्रकार बोरिय मजुमदार यांच्यावर BCCIने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. श्रीलंका कसोटी मालिकेआधी साहाच्या फॉर्मवरून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्याला निवृत्त होण्याचा सल्लाही BCCI मधून दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याला श्रीलंका मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. या सर्व प्रकारावर मुलाखत देण्यास साहाने मजुमदार यांना नकार दिला होता. त्यावेळी, मजुमदार यांनी साहाला मेसेज करून धमकी दिली होती आणि साहाने त्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केले.
वृद्धिमान साहाने BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत काही विधाने केली होती. त्यानंतर बोरिया मजुमदार यांनी त्याला मुलाखतीसाठी विचारले होते. पण साहाने मात्र त्यास सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे खवळलेल्या बोरिया मजुमदार यांनी त्याला मेसेज करत धमकी दिली. 'तू मला कॉल बॅक केला नाहीस. मी परत कधीही तुझी मुलाखत घेणार नाही. आणि हा मी माझा अपमान समजतो. मी माझा अपमान कधीही विसरत नाही. तू हे करायला नको होतंस', असे मेसेज मजुमदार यांनी केले होते. साहाने हे मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
BCCI नेही हे प्रकरण गांभीर्याने घेताना साहा व मजुमदार या दोघांचेही बोलणे ऐकून घेतले. त्यानंतर आज बीसीसीआयने मजुमदार यांच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. मजुमदार यांना आता भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किंवा कोणत्याही क्रिकेट सामन्यांचे accreditation मिळणार नाही. त्याशिवाय बीसीसीआयशी नोंदणीकृत क्रिकेटपटूंची मुलाखतही त्यांना घेता येणार नाही.