मुंबई : टाटा आयपीएल २०२४ पूर्वी सुरू मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना एक खुशखबर मिळाली. कारण लखनौ सुपर जायंट्सकडून (LSG) खेळणारा वेस्ट इंडिजचा गोलंदाज रोमारियो शेफर्डचा मुंबईच्या फ्रँचायझीसोबत करार झाला आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात शेफर्ड मुंबईच्या ताफ्यात दिसेल. त्याने आतापर्यंत चार आयपीएल सामने खेळले असून लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. ५० लाख रूपयांच्या किंमतीत मुंबईच्या फ्रँचायझीने शेफर्डला आपल्या सोबत घेतले.
शेफर्डने हैदराबादच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. हैदराबादने २०२२ च्या आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला ७.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. यानंतर लखनौ सुपर जायंट्सने त्याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामात ५० लाख रुपये देऊन आपल्या संघाचा भाग बनवले. शेफर्डने आतापर्यंत एकूण चार आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५८ धावा केल्या आहेत तर ३ बळी घेण्यात त्याला यश आले.
आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी संघ खेळाडूंना ट्रेड करू शकतात. तसेच सर्व आयपीएल फ्रँचायझींना एक महिन्याआधी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत संघात कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. २०२४ च्या हंगामाचा लिलाव जवळपास एक महिन्यानंतर होणार आहे.