Join us  

गोलंदाजांनी केली यजमान राजस्थान रॉयल्सची कोंडी

चेन्नईला १५२ धावांचे आव्हान : चाहर, शार्दुल, जडेजा यांचा ‘सुपर’ मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 5:11 AM

Open in App

जयपूर : गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने यजमान राजस्थान रॉयल्सला २० षटकात ७ बाद १५१ धावा असे रोखले. दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेत यजमानांना रोखण्यात मोलाचे योगदान दिले.

सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून चेन्नई कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने यजमानांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. सध्या गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थानला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरीत सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे.

कर्णधार अजिंक्य रहाणे व फॉर्ममध्ये असलेला जोस बटलर यांनी अपेक्षित फटकेबाजी करताना राजस्थानला वेगवान सुरुवात करुनही दिली. मात्र दीपकने तिसºया षटकात रहाणेला पायचीत पकडले आणि राजस्थानच्या फलंदाजीला गळती लागली. रहाणेने ११ चेंडूत ३ चौकारांसह १४ धावा केल्या.

यानंतर सर्वांच्या आशा बटलच्या फटकेबाजीवर होत्या. त्याला साथ देण्यास दुखापतीतून पुनरागमन केलेला संजू सॅमसन खेळपट्टीवर आला होता. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांवरही काहीसे दडपण आले होते. परंतु शार्दुल, सँटनर यांनी अनुक्रमे बटलर व सॅमसन यांना पाठोपाठच्या षटकात बाद करुन राजस्थानची ३ बाद ५३ अशी अवस्था केली. दोन प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने राजस्थानच्या वेगवान धावगतीला ब्रेक बसला.

बटलरने १० चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह २३ धावांचा तडाखा दिला, तर सॅमसन केवळ ६ धावा काढून परतला. या पडझडीनंतर अनुभवी स्टीव स्मिथ (१५) आणि राहुल त्रिपाठी (१०) स्वस्तात परतल्याने राजस्थानवर कमालीचे दडपण आले. बेन स्टोक्स याने २६ चेंडूत एका चौकारासह २८ धावा केल्या. दडपणाखाली स्टोक्सकडून अपेक्षित फटकेबाजी न झाल्याने राजस्थानल मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. यानंतर जोफ्रा आर्चर (१३*) आणि श्रेयस गोपाल (१९*) यांनी काही आक्रमक फटके खेळले. दोघांच्या छोटेखानी आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला समाधानकारक मजल मारण्यात यश आले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएल 2019