लाहोर : पाकिस्तान क्रिकेट संघात सुधारणा घडवून आणण्याच्या मोहिमेंतर्गत बुधवारी माजी कर्णधार मिसबाह उल हक याच्याकडे मुख्य प्रशिक्षक तसेच मुख्य निवडकर्ता पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पाक संघ जुलैमध्ये विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता.त्यामुळे पीसीबीने तत्कालीन मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा कार्यकाळ संपविण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी प्रशिक्षक अझहर मेहमूद आणि फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना देखील बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. मिसबाह पुढील तीन वर्षांसाठी प्रशिक्षक असतील, असे पीसीबीने जाहीर केले.
माजी गोलंदाज वकार युनूस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू इन्तिखाब आलम व वाजीद खान, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे सदस्य असद अली खान, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान आणि मंडळाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे संचालक झाकीर खान या पाच सदस्यांच्या समितीने मिसबाह याची एकमताने निवड केली. मिसबाहसह डीन जोन्स, मोहसीन खान आणि कर्टनी वॉल्श हे तीन दिग्गज क्रिकेटपटूही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. पण पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मिसबाहवर विश्वास दाखवला. तसेच मिसबाहच्या शिफारसीनुसार माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचाही कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. पाक संघासाठी मिसबाह ३० वा मुख्य प्रशिक्षक असेल. वकार याआधी दोनदा मुख्य प्रशिक्षक राहीले आहेत.