मुंबई, दि. 12 - एक वेळ होती जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरचा जलवा असायचा. जवळपास दोन दशकं सचिनचा क्रिकेटच्या मैदानावर बोलबाला होता. आता वेळ बदलली आहे. संन्यास घेतल्यापासून सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानावर पुर्वीसारखा दिसत नाही. पण एक नवा तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानावर सध्या नाव गाजवतोय आणि तो दुसरा कोणी नाही तर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. अर्जुन डावखु-या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा सचिनलाही गोलंदाज बनायचं होतं पण......पुढे काय झालं तो इतिहास आहे.
दोन महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये सराव करताना अर्जुन तेंडुलकरच्या एका वेगवान चेंडूमुळे इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेयरस्टो जखमी झाला होता. अर्जुनच्या पहिल्याच चेंडूचा बेयरस्टो सामना करत होता आणि तो यॉर्कर चेंडू होता. अर्जुननं टाकलेला हा यॉर्कर थेट बेयरस्टोच्या अंगठ्यावर जाऊन आदळला आणि बेयरस्टोला नेट प्रॅक्टीस सोडावी लागली. तेव्हापासून अर्जुनच्या गोलंदाजीची चर्चा सुरू झाली. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा इंग्लंडमध्ये महिला विश्वचषक सुरू होता. त्यावेळी भारतीय महिला संघातील खेळाडूंनी अर्जुनच्या गोलंदाजीवर नेट प्रॅक्टिस केली होती. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओत 17 वर्षांचा अर्जुन 130 प्रतिताशी किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथ यानेही काही दिवसांपूर्वी अर्जुनची गोलंदाजी पाहायची असल्याचं म्हटलं होतं. मी त्याची गोलंदाजी पाहिलेली नाही पण मला त्याची गोलंदाजी पाहायची इच्छा असल्याचं तो म्हणाला होता. 17 व्या वर्षात 130 चा स्पीड त्याचं भविष्य उज्वल असल्याचं दर्शवत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. अर्जुनला त्याच्या मेहनतीचे फळ देखील नुकतेच मिळाले असून त्याची 19 वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड झाली आहे.
पाहा व्हिडीओ-