नवी दिल्ली : ऑलिडेल कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा व युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील आगामी कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण भारतीय संघ २६ डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अनेक बदलासह उतरण्यास प्रयत्नशील राहील.अनुभवी रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघासोबत जुळू शकणार आहे. अशा स्थितीत सराव सामन्यात शानदार फलंदाजी करणारा शुभमन गिल याला सलामीवीर फलंदाज म्हणून संधी मिळू शकते.पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अपयशी ठरलेला साहा संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविण्यात अपयशी ठरला. अशा स्थितीत पंतला संधी मिळणे निश्चित आहे. पंतने सराव सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात (२०१८) एक शतकी खेळी केली होती.कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या ३६ वर्षीय साहाच्या स्थानी संघ व्यवस्थापन पुढील तीन सामन्यांत पंतला संधी देऊ शकते. पंतची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरली तर त्याला इंग्लंडविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही संधी मिळणे निश्चित आहे. साहाची बॅट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेत शांतच राहिली आहे. या देशांमध्ये त्याच्या नावावर एकाही अर्धशतकाची नोंद नाही.शॉबाबत चर्चा केली तर २१ वर्षीय मुंबईचा हा फलंदाज तंत्र, खेळाबाबत स्वभाव व त्याचे वर्तन प्रश्न उपस्थित करण्यास पुरेसे आहे. फलंदाजीचे त्याचे तंत्र त्याचसोबत क्षेत्ररक्षण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचे नाही. आयपीएलपासून त्याच्या क्षेत्ररक्षणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. बाह्यमैदानावर संथ असल्यामुळे त्याने मार्नुस लाबुशेनचा सोपा झेल सोडला. त्यामुळे धावसंख्येवर ३० धावांचे अतिरिक्त दडपण आले.कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ हनुमा विहारीला पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी संधी देऊ शकतो. त्याचे प्रसाद यांनीही समर्थन केले आहे.विहारीची फलंदाजी जवळून अनुभवणारे प्रसाद म्हणाले, ‘विहारीकडे कसोटीसाठी चांगले तंत्र व कौशल्य आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ राहू शकतो. विराटच्या अनुपस्थितीत त्याच्यासाठी व लोकेश (राहुल) याला चांगली संधी राहील. पुढील काही सामन्यात विहारीला चौथ्या किंव्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना बघणे मला आवडेल. तो लढवय्या असून चांगली कामगिरी करेल, अशा मला विश्वास आहे. राहुल या मालिकेत सहाव्या क्रमांकासाठी चांगला फलंदाज ठरू शकतो.’
आमच्या कार्यकाळादरम्यान साहा व पंत यांच्याबाबत योजना होती. आमची योजना स्पष्ट होती की, इंग्लंड व ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये पंत यष्टिरक्षणासाठी पहिली पसंती राहील तर सहाव्या क्रमांकानंतर अधिक फलंदाजीची गरज नसलेल्या भारतात स्पेशालिस्ट यष्टिरक्षकाला संघात स्थान देता येईल. माझ्या मते पंतने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा केली आहे. गुलाबी चेंडूच्या सरावा सामन्यादरम्यान तो फॉर्मात असल्याचे दिसून आले. अशा स्थितीत पुढील तीन कसोटी सामन्यांत त्याला संधी मिळाली तर मी संघ व्यवस्थापनाचे समर्थन करील.’ - एमएसके प्रसाद, माजी निवड समिती प्रमुख