Join us  

Asia Cup 2022: भारताचा पराभव होताच #BoycottIPL ट्रेंडिंगला सुरुवात; सोशल मीडियावर खेळाडू ट्रोल

आशिया चषकात भारताचा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 5:06 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाची खेळी अतिशय निराशाजनक पाहायला मिळत आहे. संघाने सलग दोन सामने गमावले असून स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आशिया चषकाच्या स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या संघाची कामगिरी पाहून चाहते चांगलेच संतापले आहेत. भारताला पाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघात असलेला प्रत्येक खेळाडू आयपीएलमधील स्टार आहे. मागील दोन सामन्यातील कामगिरी लाजीरवाणी आहे. यासाठी चाहते आयपीएलला दोष देत असून ट्विटरवर #BoycottIPL ट्रेंडिंगला सुरुवात झाली आहे. 

भारतीय संघाला सुपर-4 मधील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात देखील भारताला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरल्याने चाहत्यांमध्ये रोष आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहल वगळता कोणत्याच गोलंदाजाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. 

कर्णधार रोहित शर्मा निशाण्यावरआयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दीपक चहर, श्रेयस अय्यर फिट असताना देखील त्यांना बाहेर बसावे लागत असून ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनाही संधी दिली जात नाही. ही नावे कर्णधार रोहित, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीला विचार करण्यास भाग पाडणारी आहेत. सॅमसन आणि किशन यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली होती. असे असतानाही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर रोहितची खिल्ली उडवली जात आहे. 

पंतच्या चुकीमुळे आली धोनीची आठवण स्टंम्पमागे उभ्या असलेल्या ऋषभ पंतचे अपयश पाहिल्यानंतर चाहते निराश झाले असून त्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण आली. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा धोनी अजूनही आयपीएलमध्ये तितकाच फिट दिसत आहे. यामुळेच चाहते सोशल मीडियावर धोनीच्या पुनरागमनाबद्दल भाष्य करत आहेत. खरं तर रिषभ पंतकडून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूंवर धाव बाद करण्याची संधी हुकली. त्यामुळेच चाहत्यांनी धोनी असायला हवा होता असा सूर धरला आहे. 

श्रीलंकेच्या विजयाची हॅट्रिकश्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. सुपर-4 च्या कालच्या सामन्यात त्यांनी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतालाच बाहेर केले. भारताने विजयासाठी ठेवलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने 6 गडी व 1 चेंडू राखून रोमहर्षक रित्या पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( 57) व पथूम निसंका (52) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या बळीसाठी 97 धावांची भागीदारी नोंदवली. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी 34 चेंडूंत नाबाद 64 धावा करून 6 गडी राखून विजय मिळवला. शनाका 18 चेंडूंत 33 धावांवर, तर राजपक्षा 25 धावांवर नाबाद राहिला.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध श्रीलंकाआयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीरोहित शर्मा
Open in App