Join us  

BPL मध्ये घडला असता चमत्कार, एकाच संघाकडून ठरले असते दोन शतकवीर

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळेच ट्वेंटी-20 लीगमधील प्रत्येक सामना हा नव्या विक्रमाला जन्म देणारा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 9:40 PM

Open in App

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळेच ट्वेंटी-20 लीगमधील प्रत्येक सामना हा नव्या विक्रमाला जन्म देणारा असतो. असाच विक्रम आज बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये झाला असता. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी सिल्हट थंडर्स आणि खुल्ना टायगर्स यांच्यात सामना झाला. थंडर्स संघानं 80 धावांच्या फरकानं हा सामना खिशात घातला. याच सामन्यात थंडर्सच्या दोन फलंदाजांचे शतक होण्याचा विक्रम नोंदवला गेला असता, परंतु त्यापैकी एकालाच यश आले आणि दुसरा शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरला.

थंडर्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 232 धावा केल्या. सलामीवर आंद्रे फ्लेचर आणि अब्दुल मझीद यांना पहिल्या विकेटसाठी 11 धावा जोडता आल्या. मझीद 2 धावा करून रॉबी फ्रायलिंकच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर मात्र, फ्लेचर आणि जॉनसन चार्ल्स यांनी तुफान फटकेबाजी केली. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. पण, चार्ल्स 38 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकारांसह 90 धावांवर माघारी परतला. तेराव्या षटकात थंडर्सला हा धक्का बसला. त्यानंतर फ्लेचरनं 57 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 103 धावा कुटल्या. जर चार्ल्स बाद झाला नसता, तर आजच्या सामन्यात दोन शतकवीर झाले असते. ट्वेंटी-20 क्रिकेटमधली ही पाचवी घटना असती. थंडर्सच्या 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायगर्सचा संपूर्ण संघ 152 धावांत माघारी परतला. रिली रोसोव ( 52) आणि रॉबी फ्रायलिंक ( 44) यांनी खिंड लढवली. कृष्मार सँटोकीनं 3 विकेट्स घेतल्या.

ट्वेंटी-20 एकाच डावात ठरलेले दोन शतकवीर

  • 26 जून 2011 - ग्लोसेस्टरशायर 3 /254 वि. मिडलसेक्स 8/149 - केव्हीन ओ'ब्रायन 119 व हामिश मार्शल 102
  • 14 मे 2016 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 3/248 वि. गुजरात लायन्स 104 - विराट कोहली 109 व एबी डिव्हिलियर्स 129
  • 25 जानेवारी 2019 - रंगपूर रायडर्स 4/239 वि. चित्तागोंग विकिंग्स 8/167 - अॅलेक्स हेल्स 100 व रिली रोसोव 100
  • 31 मार्च 2019 - सनरायझर्स हैदराबाद 2/231 वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 113 - जॉनी बेअरस्टो 114 वि. डेव्हिड वॉर्नर 100*
टॅग्स :बांगलादेशटी-20 क्रिकेटविराट कोहलीएबी डिव्हिलियर्सडेव्हिड वॉर्नर