Yesha Sagar Controversy, BPL 2025 : बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धा गेल्या कित्येक दिवसांपासून वादाचे केंद्र बनले आहे. सुरुवातीला खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर आता भारतीय वंशाची स्पोर्ट्स प्रेझेंटर येशा सागर लीगमधून बाहेर पडल्याची बातमी आली. येशा सागरवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आणि तिला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्याला लीग सोडण्यास भाग पाडण्यात आल्याचे बोलले जात असून तिचा करारही संपुष्टात आणला आहे.
नेमकं काय घडलं?
येशा सागर २०२५ च्या बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) मध्ये चितगाव किंग्ज संघाशी संबंधित होती. ती त्यांची ऑफिशियल स्पोर्ट्स प्रेझेंटर होती. बांगलादेशच्या एका न्यूज पोर्टलमधील वृत्तानुसार, येशा सागरला तिच्या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल फ्रँचायझी मालक समीर कादर चौधरीकडून कायदेशीर नोटीस मिळाली होती.
येशाचा करार रद्द
चित्तगाव किंग्जचे मालक समीर कादर चौधरी यांनी नोटीसमध्ये म्हणाले की, करारानुसार येशा तिची जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरली आणि अधिकृतपणे आमंत्रित असूनही ती स्पॉन्सर्स ऑफिशियल डिनरला आली नाही. तिने प्रायोजकांचे शूटिंग आणि प्रमोशनल शाऊट आउट्सही पूर्ण केले नाहीत. यामुळे फ्रँचायझीला आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर नोटीशीला उत्तर देण्याऐवजी येशा सागरने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संघाने तिचा करार रद्द करून टाकला.
येशा सागरची बाजू काय?
येशा सागरने याआधीही स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम केले आहे. स्पोर्ट्स अँकर म्हणून तिने ग्लोबल टी२० कॅनडा आणि यूपी टी२० लीगसह अनेक लीगचे अँकरिंग केलेले आहे. पण बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत जे घडले ते फारच विचित्र होते. येशा सागरने स्वत: अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तिची बाजू अद्याप क्रिकेटरसिकांसमोर आलेली नाही.