ढाका : पाकिस्तानचा तडाखेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये 25 चेंडूंत नाबाद 39 धावांची खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. आफ्रिदीने सोमवारी केलेला विक्रम आतापर्यंत कोणत्याही पाकिस्तानच्या खेळाडूला करता आलेला नाही. अशी कामगिरी करणारा तो जगभरातला तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर कोमिल्ला व्हिक्टोरियन्स संघाने चार विकेट राखून सिल्हेट सिक्सर्स संघावर विजय मिळवला.
सिक्सर्स संघाने विजयासाठी ठेवलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना तमीम इक्बालने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, त्यांचे पाच फलंदाज झटपट बाद झाले. स्टीव्हन स्मिथ ( 16) आणि शोएब मलिक ( 13) हेही अपयशी ठरल्यानंतर आफ्रिदीने वादळी खेळी केली. आफ्रिदीने 25 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 39 धावा केल्या आणि संघाला 4 विकेट व 1 चेंडू राखून विजय मिळवून दिला. सिक्सर्सच्या निकोलस पूरणने 26 चेंडूंत 5 चौकार व 2 षटाकर खेचून 41 धावांची खेळी केली.
आफ्रिदीने या खेळीच्या जोरावर ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 4000 धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा करणारा तो पाचवा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. मात्र, 4000 पेक्षा अधिक धावा आणि 300 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. जगभरात अशी अष्टपैलू कामगिरी ड्वेन ब्राव्हो आणि शकिब अल हसन यांनी केली आहे. ब्राव्होच्या नावावर 6082 धावा व 464 विकेट, तर शकिबच्या नावावर 4455 धावा व 322 विकेट आहेत.