आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि काल मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे. शिवाय राजस्थान रॉयल्सनेही एका युवा खेळाडूला आपल्या चमून दाखल करून घेतले आहे. त्यांनी न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले. IPL2020च्या ट्रेडमध्ये आता आणखी एक मोठं नाव आलं आहे. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं संघाची साथ सोडली आहे. तो पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे आणि यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
रहाणे 2011पासून राजस्थान रॉयल्सचा सदस्य आहे आणि 2012च्या मोसमात त्यानं आयपीएलमध्ये शतकही झळकावलं होतं. त्यानंतर तो राजस्थानचा प्रमुख फलंदाज आहे. 2016 व 2017मध्ये त्यानं रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केलं. पण, आता अजिंक्य पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या गब्बर शिखर धवनच्या खांद्याला खांदा लावून अजिंक्य आयपीएलचा पुढील हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा मान अजिंक्यनं पटकावला आहे. त्यानं राजस्थानकडून 2011 ते 2015 आणि 2018 व 2019 या कालावधीत एकूण 100 आयपीएल सामने खेळले आहेत. संघाकडून सर्वाधिक 2810 धावांचा विक्रमही अजिंक्यच्या नावावर आहे. त्यानं 122.65च्या स्ट्राईक रेटनं या धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.