मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले. त्यामुळे विराट कोहलीकडे नेतृत्व राहणार की नाही, महेंद्रसिंग धोनीला संघात स्थान मिळणार की नाही, या सर्व प्रश्नांची उकल रविवारी दुपारी 3 वाजल्यानंतर होईल. मुंबईत ही बैठक होणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेच चर्चेचा विषय ठरले आहेत. कोहलीच्या नेतृत्वावर, तर धोनीच्या स्पर्धेतील कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याची आणि धोनीनं निवृत्ती स्वीकारायची मागणी होत आहे. त्यामुळे रविवाऱ्या होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं 'हे' उत्तर
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोहलीकडे कसोटीचे तर हिटमॅन रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी मागणी आहे. पण, असे पर्याय भारतात कामी येत नसल्याचीही चर्चा आहे. बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक रविवारी होणार आहे आणि त्यात याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
पण, सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच राहणार आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 संघाची धुरा ही कोहलीच्याच खांद्यावर ठेवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत त्याची अधिकृत माहिती दिली जाईल. "रविवारी सर्व अफवांना पूर्णविराम दिला जाईल,'' असे सूत्रांनी सांगितले.