ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानेही ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ''विश्वास बसत नाही. जगातील दिग्गज फिरकीपटू, सुपर स्टार शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.''
वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमनेही एक स्टेटमेंट काढून याबाबत माहिती दिल्याचे समजते आहे. वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याचे सांगण्यात येत आहे. ''"शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्याला पुनरुज्जीवित करता आले नाही," असे निवेदनात म्हटले आहे.
१९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.