आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी कठोर निर्णय देताना बांगलादेशचा कर्णधार आणि आयसीसीच्या जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आह. त्यानं तीन आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. त्यानंतर आयसीसीनं हा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला पुढील मोसमात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे.
शकिब म्हणाला,''ज्या खेळावर मी मनापासून प्रेम केलं, त्यापासून दोन वर्ष दूर रहावे लागणार असल्यानं खुप निराश आहे, परंतु मी माझी चूक मान्य करतो.'' शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. ही माहिती शाकिबनं आयसीसीपासून लपवली, त्यामुळं त्याच्यावर ही बंदीची कारवाई झाली.
कलम 2.4.4 - फिक्सिंगची ऑफर असल्याची माहिती शकिबनं आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही. जानेवारी 2018मध्ये तिरंगी मालिके दरम्यान हा प्रकार घडला होता. शिवाय यापूर्वी एप्रिल 2018मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही त्याला फिक्सिंगची ऑफर होती. तिही त्यानं आयसीसीला दिली नाही.
शकिबनं हे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा काळ 2018 पासून सुरू होणार असल्यानं तो 29 ऑक्टोबर 2020मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. आयसीसीचे महाव्यवस्थापक अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की,''शकिबकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. त्यानं आयसीसीच्या अनेक शिबिरांना हजेरी लावली आहे. तरीही त्यानं नियमांचे उल्लंघन केले. त्यानं चूक मान्य केली आहे आणि तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.''