भारत-इंग्लंड यांच्यातली निर्णयाक कसोटी जुलै महिन्यात खेळवण्यात येणार आहे. मागच्या वर्षी कोरोनच्या शिरकाव झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावरील पाचवी कसोट स्थगित करण्यात आली होती. भारतीय संघ पाच सामन्यांच्या या कसोटीत २-१ असा आघाडीवर आहे आणि पाचव्या कसोटीतून यजमान इंग्लंड मालिका पराभव टाळण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. या महत्त्वाच्या कसोटीसाठी इंग्लंडने मोठा डाव खेळला असून बेन स्टोक्सच्या ( Ben Stokes) खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आले. इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व आता बेन स्टोक्स करणार आहे आणि त्यानिमित्ताने स्टोक्स विरुद्ध विराट कोहली ( Ben Stokes vs Virat Kohli) ही ठसन पाहायला मिळणार आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) ही घोषणा केली आहे.
जो रूटने ( Joe Root) पाच वर्ष इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. आता ही जबाबदारी स्टोक्सकडे सोपवण्यात आली आहे. स्टोक्स हा इंग्लंडचा ८१वा कसोटी कर्णधार आहे. इंग्लंड क्रिकेटचे नवे व्यवस्थापकिय संचालक रॉब की यांनी बेनच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि ECB ने त्याला मान्यता दिली. ''बेन स्टोक्सकडे ही जबाबदारी सोपवण्यात मला कोणताच संकोच वाटला नाही. तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि इंग्लंडच्या कसोटी संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी हवा असलेला दृष्टीकोन त्यात आहे. त्याने ही जबाबदारी स्वीकारली याचा मला आनंद आहे,''असे की यांनी स्पष्ट केले.
बेन स्टोक्सने ७९ कसोटी सामन्यांत ५०६१ धाव केल्या आहेत आणि त्यात ११ शतकं व २६ अर्धशतकांचा समावेश आहे. २५८ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या नावावर १७४ कसोटी विकेट्सही आहेत.