यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) काही चांगली राहिली नाही. IPL 2020ला सुरुवात होण्यापासून त्यांच्यामागे लागलेलं संकट त्यांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. सुरेश रैना व हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर CSKची स्पर्धेतील कामगिरी कशी झाली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फॅफ ड्यू प्लेसिस वगळता त्यांच्या अन्य कोणत्याच खेळाडूला सातत्य राखता आले नाही. आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) या संघावर प्ले ऑफमधून बाहेर फेकले जाण्याचे संकट ओढावले आहे. १० सामन्यांत त्यांना ७ पराभव पत्करावे लागले आहेत. त्यात त्यांना बुधवारी आणखी एक धक्का बसला. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होनं मांडीचा सांधा दुखावल्यामुळे मैदान सोडले होते. सामन्यानंतर धोनीनंही तो दुखापतग्रस्त झाल्याचे सांगितले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, आता ब्राव्होनं माघार घेतल्याचे वृत्त आहे. ''ब्राव्हो आता या स्पर्धेत पुढे खेळू शकणार नाही. मांडीचा सांधा दुखावल्यामुळे त्यानं माघार घेतली आहे. तो येत्या दोन दिवसांत मायदेशात परतणार आहे,''असे CSKचे CEO कासी विश्वनाथन यांनी सांगितले.
कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) त्याला दुखापत झाली होती आणि त्याला काही सामन्यांना मुकावे लागले होते. त्यानंतर तो आयपीएलसाठी दुबईत दाखल झाला. यंदाच्या मोसमात ब्राव्होला आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. त्यानं ६ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत.
''सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे संघाचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवली. पण, त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा आपल्याला आदर करायला हवा,''असेही विश्वनाथन यांनी सांगितले.
चेन्नई सुपर किंग्स परावलंबी!
चेन्नई सुपर किंग्स ( CSK) - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK साठी यंदाचे वर्ष हे अत्यंत निराशाजनक म्हणावे लागेल. १० पैकी ७ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे आणि IPL इतिहासात प्रथमच ते गुणतक्त्यात तळाला गेले आहेत. आयपीएलच्या प्रत्येक पर्वात किमान प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ म्हणून CSK ओळखला जातो, परंतु यंदा तोही विक्रम तुटण्याची शक्यता आहे. आता त्यांना उर्वरीत चारही सामने जिंकण्यासोबतच चौथ्या स्थानाच्या शर्यतीत असलेल्या संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. त्यामुळे चेन्नईला आता परावलंबी रहावे लागेल.
Web Title: BREAKING: CSK all-rounder Dwayne Bravo ruled out of IPL 2020 with groin injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.