Indian Premier League ( IPL 2020) दुखापतीचे सत्र कायम आहे. आर अश्विन, इशांत शर्मा, नॅथन कोल्टर-नायर, अंबाती रायुडू, केन विलियम्सन, ख्रिस वोक्स, मिचेल मार्श यांच्यानंतर आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या मार्शनं IPL 2020 मधून माघार घेतली आहे. त्यात आणखी एका खेळाडूला दुखापतीमुळे IPL 2020तून माघार घ्यावी लागत आहे. IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या माघारीमुळे दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का बसणार आहे. अमित मिश्रा ( Amit Mishra) असे या खेळाडूचे नाव आहे आणि त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 160 विकेट्स आहेत.
हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो आरसीबीविरुद्ध खेळू शकणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शारजाह मैदानावर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना अमितच्या बोटाला दुखापत झाली होती. मिश्राच्या अनुपस्थित आरसीबीच्या फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीला फिरकीविरुद्ध बाद करण्यात दिल्लीपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कोहली लेगस्पिनर्सविरुद्ध अडखळताना दिसला आहे. यंदाच्या मोसमातही मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना कोहली लेगस्पिनर राहुल चहरचा बळी ठरला होता. त्यामुळे आता मिश्राच्या जागी दिल्ली संघात अक्षर पटेलला संधी मिळण्याचे जवळपास निश्चित आहे.
''अमित मिश्राच्या दुखापतीचा रिपोर्ट आला आणि त्याचबरोबर वाईट बातमीही येऊन धडकली. तो संपूर्ण पर्वात आता खेळणार नाही आणि त्याच्य रिप्लेसमेंटचा आम्ही विचार करत आहोत. तो चांगल्या फॉर्मात होता आणि अशात त्याला झालेली दुखापत निराशाजनक आहे. त्याचा अनुभव येथील खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्यासाठी संघाच्या कामी येत होता,''असे दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यानं ANIला सांगितले.
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मिश्रानं शुबमन गिलला बाद केले होते. त्यानं 2 षटकांत 14 धावा देताना 1 विकेट घेतली होती. मिश्रानं तीन सामन्यांत 0/23, 2/35 आणि 1/14 अशी कामगिरी केली आहे. त्यानं IPLमध्ये 150 सामन्यांत 160 विकेट्स घेतल्या आहेत. लसिथ मलिंगा 170 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.