दुबई : ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केली. 31 डिसेंबर 2018च्या आयसीसी ट्वेंटी-20 क्रमवारीनुसार हे संघ ठरवण्यात आले आहेत. पात्रतेच्या निकषानुसार यजमान ऑस्ट्रेलिया आणि अन्य नऊ संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. त्यातील अव्वल आठ संघ थेट सुपर 12 मध्ये खेळतील, तर उर्वरित दोन संघ अन्य सहा संघांसह साखळी फेरीत खेळतील. हे अन्य सहा संघ पात्रता फेरीतील असतील.
श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने संघाला सुपर 12 मध्ये प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे, परंतु त्याने साखळी फेरीत दमदार कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन यानेही सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.