भारताला १९८३चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध शर्मा यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यांनी ३७ कसोटींत १६०६ धावा, ४२ वन डेत ८८३ धावा केल्या होत्या. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. यशपाल शर्मा यांच्या मृत्यूनंतर माजी कर्णधार कपिल देव अश्रू रोखू शकले नाहीत.
१९७२ मध्ये पंजाबच्या शालेय संघाकडून खेळताना यशपाल शर्मा यांनी जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध २६० धावांची खेळी केली होती आणि तेव्हा ते चर्चेत आले. त्यानंतर दोन वर्षांत त्यांची राज्याच्या संघात निवड झाली आणि नॉर्थ झोन संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विझ्झी ट्रॉफी जिंकली. नॉर्थ संघाकडून दुलीप ट्रॉफीत त्यांनी १७३ धावांची खेळी केली होती. त्यांनी साऊथ झोन संघाविरुद्ध ही खेळी केली, त्या संघात चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना आमइ वेंकटराघवन हे स्टार खेळाडू होते. १९७९मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप संघात त्यांचा समावेश होता, परंतु त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, इंग्लंड दौऱ्यावर त्यांना तीन कसोटी सामने खेळण्यास मिळाले आणि त्यांनी ५८च्या सरासरीनं ८८४ धावा केल्या.
इंग्लंड मालिकेतील कामगिरीमुळे त्यांना आणखी कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कानपूर कसोटीत त्यांनी शतक झळकावले. १९८०-८१मध्ये व्हिक्टोरीया संघाविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी ४६५ मिनिटांत नाबाद २०१ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती. १९८१-८२ साली भारतीय संघात पुनरागमन करताना त्यांनी इंग्लंडविरुद्ध मद्रास कसोटीत १४० धावा कुटल्या होत्या. त्यांनी गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासोबत संपूर्ण दुसरा दिवस खेळून काढताना तिसऱ्या विकेटसाठी ३१६ धावांची भागीदारी केली होती. पुढील वर्षी पोर्ट ऑफ स्पेन येथील कसोटीत मॅलकोल्म मार्शल यांच्या चेंडूवर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली अन् त्यांना सामन्यातून रिटायर व्हावं लागलं.
१९८३च्या वर्ल्ड कपसाठी त्यांची निवड झाली आणि पहिल्याच सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कपमधील तो पहिलाच पराभव होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
त्यानंतरच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्यांना अपयश आलं. अम्रीतसर येथे नॉर्थ झोन विरुद्ध वेस्ट इंडियन्स या तीन दिवसीय सामन्यात त्यांनी व्हिव्ह रिचर्ड यांना सलग चार खणखणीत षटकार खेचले होते. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपयशानं त्यांची पाठ सोडली नाही. १०८७-८८मध्ये त्यांनी पंजाबसोडून हरयाणा संघ जॉईन केला. पुढील दोन वर्ष ते रेल्वेकडून खेळले. वयाच्या ३७व्या वर्षीही त्यांनी १९९१-९२मध्ये सलग दोन शतकं झळकावली. निवृत्तीनंतर त्यांनी अम्पायरिंग केली अन् २००३ ते २००६ या काळात ते भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य होते.